अंगारकी चतुर्थीवरही कोरोनाचं सावट; मंदिरात प्रवेश बंद

भाविकांना घ्यावं लागणार मंदिराबाहेरून दर्शन 

Updated: Mar 2, 2021, 03:37 PM IST
 अंगारकी चतुर्थीवरही कोरोनाचं सावट; मंदिरात प्रवेश बंद title=

मुंबई : आज अंगारकी चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi 2021). गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आज मंदिरांमध्ये मोठी गर्दी असते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी मंदिरात आज प्रवेश बंद आहे. मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरात आज केवळ क्यूआर कोड असणा-यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. दगडूशेठ मंदिर, गणपतीपुळ्यात तसंच टिटवाळ्याच्या मंदिरात आज प्रवेशावर बंदी आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी गणपती मंदिर परिसरात अंगारकी चतुर्थीला संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरवर्षी अंगारकीला मोरया गोसावी गणपती दर्शनाला 80 हजार भाविक येतात. यंदा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलीय. तर परिसरातील दुकानंही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

अंगारकी संकष्टी चतुर्थीची माहिती 

आज म्हणजे 2 मार्च फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी  म्हणून ओळखली जाते. म्हणून त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi 2021) म्हटलं जातं. 

अंगारकी संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त 

आजचा शुभ मुहूर्त - चतुर्थी तिथि प्रारंभ : 2 मार्च 2021 मंगलवार सकाळी 05:46 वाजता - चतुर्थी तारीख समाप्त : 3 मार्च 2021 बुधवार रात्री 02:59 वाजता - चंद्रोदय वेळ : 09:41 वाजता