संपूर्ण Lockdown ची चर्चा : लोकल सुरु राहणार की बंद होणार ? वाचा, रेल्वेचे स्पष्टीकरण

 अनेक राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लादले जातातय

Updated: Apr 9, 2021, 05:42 PM IST
संपूर्ण Lockdown ची चर्चा : लोकल सुरु राहणार की बंद होणार ? वाचा, रेल्वेचे स्पष्टीकरण title=

मुंबई : वेगाने वाढणार्‍या कोरोना व्हायरसच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील अनेक राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लादले जात आहेत. अनेक राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू आहे. शनिवार आणि रविवार लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, गाड्या पुन्हा बंद करण्याबाबतची चर्चा अधिक जोर धरु लागलीय. यावर रेल्वेने (Indian Railways) शुक्रवारी प्रतिक्रिया दिली.

'रेल्वे सेवा थांबविण्याची किंवा गाड्यांची संख्या कमी करण्याची कोणतीही योजना नाही. ज्यांना ट्रेनमध्ये प्रवास करायचा आहे ते करू शकतात. त्यांना ट्रेन काहीच अडचण येणार नाही असे रेल्वेकडून सांगण्यात आलंय.

मजुरांच्या स्थलांतरामुळे ट्रेनमध्ये गर्दी झाल्यास आम्ही त्वरित गाड्यांची संख्या वाढवू. उन्हाळ्यातील गर्दी पाहता आम्ही आधीच काही गाड्या सुरू केल्या आहेत. लोकांना घाबरून जाण्याची गरज नाही असे रेल्वेने म्हटलंय.

पहिल्या लॉकडाऊनच्या वेळचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये रेल्वे स्टेशनवर प्रवासी मजुरांची प्रचंड गर्दी दिसतेय.  हे व्हिडिओ पाहून लोक घाबरत आहेत. हे व्हिडिओ आताचे नाहीत. सध्या रेल्वे स्थानकांवर किरकोळ गर्दी आहे असल्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत मुंबईतील रेल्वे स्थानकांवर तातडीची उपाययोजना म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. 

मध्य रेल्वेचे प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी सांगितले की, आजपासून मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT), कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (CSMT)येथे प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री थांबविण्यात आली आहे.

संपूर्ण लॉकडाऊनची तयारी

राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी सर्व पक्षीय बैठक होणार आहे. बैठकीत कोविडच्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे.  

पुढील आठवड्यात सुट्ट्या अधिक असल्यामुळे संपूर्ण आठवडाभर कडक लाँकडाऊन करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिलीय. 
या बैठकीत राज्यात पुढील पूर्ण आठवडा लावून लावण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.