कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : देशाची आर्थीक राजधानी असलेल्या मुंबईत मोठी घडामोड पहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या(Mumbai Municipal Corporation) कामात झालेल्या गैरव्यवहाराची आता सखोल चौकशी होणार आहे. कोरोनाकाळात (Corona)विकास कामांवर झालेल्या खर्चाचा हिशोब घेतला जाणार आहे. मुंबई महापालिकेतील निवृत्त अधिकारी, कर्मचारी कॅगच्या(CAG ) रडारवर आहेत.
गेल्या अडीज वर्षात निवृत्त झालेल्या संबंधित विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कॅगची टीम चौकशीसाठी बोलावणार आहे. कॅगच्या पाच टीम कडून पालिकेच्या संबंधित विभागाची चौकशी केली जाणार आहे. कोरोना काळातील खर्च, रस्ते कामांत खर्च, पुलाच्या कामातील खर्च, तीन मलनि:सारण प्रक्रिया केंद्रासाठी केलेला खर्च तसेच सहा सांडपाणी प्रकल्प याची चौकशी केली जाणार आहे. पालिकेच्या जवळपास दहा खात्यांमधून व्यवहार झाल्याचा कॅगला संशय आहे. या दहा विभागात कार्यकरत असणारे निवृत्त अधिकारी, कर्मचारी कॅगच्या टार्गेटवर आहेत.
28 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यान मुंबई महापालिकेत झालेल्या व्यवहाराचे ऑडिट कॅगकडून करण्यात येणार आहे. सध्या कॅगकडून कोरोनाकाळात दिलेल्या कामांची चौकशी सुरु आहे. आता सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्य़ांसह निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.