मुंबई : मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत सर्व सहमती झालेली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी होकार दिला की नाही, याची माहिती पुढे आलेली नाही. तसेच महाविकासआघाडीची पत्रकार परिषद उद्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या अंतिम निर्णय समजण्याची शक्यता आहे.
विकासआघाडीची पहिली बैठक मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये सव्वा दोन तास चालली. याबैठकीत सत्तास्थापन करण्याबाबत चर्चा झाली. तसेच पुढील मुख्यमंत्री पदी कोण असावा याच्यावर चर्चा झाली. बैठक संपल्यानंतर शरद पवार यांनी सांगितले की, शिवसेनेसोबतच्या आघाडीच्या बैठकीत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. सत्तास्थापनेसाठी निर्णायक बैठक होती. उद्धव ठाकरे यांच्या नावावर आमच्या सर्वांची सहमती झाली, अशी माहिती पवार यांनी दिली. तसेच उद्धव ठाकरे यांनी सांगितले, चर्चा चांगली झाली. मला आता अर्धवट माहिती द्यायची नाही. तिन्ही पक्ष मिळून एकत्र येऊ तेव्हा सगळी माहिती देऊ.
NCP Chief Sharad Pawar: Uddhav Thackeray's name for CM was also discussed in the meeting, more talks will continue tomorrow https://t.co/fGi2AuLsvj
— ANI (@ANI) November 22, 2019
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी बैठक संपली असली तरी सत्ता स्थापनेच्या दाव्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. अनेक गोष्टींवर एकमत व्हायचे आहे. काही मुद्दे अजूनही बाकी आहेत. उद्या पुन्हा बैठक होणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याआधी शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना आग्रह होता.
उद्धव तयार नसल्यास पवारांकडून संजय राऊतांचे नाव पुढे करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे मात्र राऊतांच्या नावासाठी तयार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेकडून कोणाचे नाव पुढे येणार याचीच चर्चा आहे. दरम्यान, शिवसेनेने विधीमंडळ नेता म्हणून आमदार एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे. परंतु उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आग्रह असल्याची माहिती होती. आता तर विकासआघाडीत सर्वांची सहमती उद्धव यांना दिसून आली.