मुंबई : देशातील हिंदु बांधवांना विनंती आहे, मागचं पुढचं काय बघू नका, हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत, सगळ्या धार्मिक स्थळांवरचे. अभी नही तो कभी नाही, हिंदु बांधवांना विनंती आहे, तीन तारखेपर्यंत हे ऐकले नाहीत तर चार तारखेला सगळीकडे हनुमान चालिसा ऐकू आलीच पाहिजे असं आवाहन मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे. यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
राज ठाकरे यांनी केलेल्या आव्हानानंतर राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्रात हुकुमशाही चालणार नाही असं म्हटलं आहे. महाराष्ट्रात कोणी अल्टिमेटम द्यायचं, हे कायद्याचं राज्य आहे. इथे हुकुमशाही कोणाची चालणार नाही. . मग तो कोणीही असो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
कायद्याने, संविधानाने ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याचं पालन सर्वांना करावं लागेल, सर्व पक्षाच्या नेत्यांना करावं लागेल, सर्व नागरिकांना करावं लागेल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरे यांनी दावा केलाय उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवले गेले, उत्तर प्रदेशमध्ये फक्त मशिदीवरचे भोंगे उतरवले गेले नाहीत. तिथे अयोध्येला की मथुरेला पहाटेचा लाऊडस्पीकरल लागयचा, तोही बंद झाला आहे. काही जरी निर्णय झाला तरी तो सर्वांवर बंधनकारक राहील, फक्त मशिदींवरचे भोंगे काढायचे, इतर ठिकाणचे काढले जाणार नाही, असं कसं होईल असं अजित पवार यांनी म्हटलंय.
औरंगाबादच्या आयुक्तांनी काही अटी टाकून राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली होती, त्यांनी तपासावं, त्यात कोणी राजकीय हस्तक्षेप करुन नये, परवानगीचं पालन केलं गेलं नसेल तर पोलिसांनी पुढची कारवाई करावी असं अजित पवार यांनी सांगितलं.
शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले राज ठाकरे कोणत्या काळात भाषणं करतात त्यावर अवलंबून असतं, लोकसभेच्या आधी जी भाषणं झाली ती भाजपाच्या विरोधात होती, त्याच्यानंतरच्या काळात काही गोष्टी घडल्या आणि त्याचं मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन झालं. मग त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, शिवसेना यांना बोलायला सुरुवात केली.
काल बहुतेक मुद्दे हे पूर्वीचेच होते, मी असं करीन आणि मी तसं करीन यांनी शिवतीर्थ किंवा जाहीर सभेत बोलून त्यांचं काय जातंय, केसेस कार्यकर्त्यांवर होणार आहेत, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
चिथवणीखोर भाषणं करुन भडकून देणं सोप असतं. पण त्यानंतर समाजातील जातीय सलोखा असतो, तो जर उद्वस्त होणार असेल, त्यातून जातीवादी विष पेरलं जात असेल, तेड निर्माण होणार असेल तर ते महाराष्ट्राला परवडणारं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय.