मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर अजित पवार यांनी मनस्वी आनंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलीय. पण, ताब्यात घेतलं जातं पण २६ महिने चौकशी चालते, यावर मात्र अजितदादांनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान, छगन भुजबळांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी या निर्णयावर आपला आनंद व्यक्त केलाय.
'भुजबळ यांना जामीन मिळाल्याचा मनस्वी आनंद झाला आहे. मात्र, एक खंत आहे की २६ महिने चौकशी चालते. एखादा आरोप झाला आणि न्यायव्यवस्थेने निकाल दिला तर समजू शकतो. मात्र, अलिकडे ताब्यात घेतलं जातं पण जामीन मिळत नाही... मग समजतं की व्यक्ती निर्दोष आहेत... नुकतंच एका पत्रकाराच्या बाबतीत असं झाल्याचं समोर आलंय... असं इतके महिने तुरुंगात ठेवणे कितपत योग्य आहे? हा खरा प्रश्न आहे...' असं अजित पवार यांनी म्हटलंय. अर्थात न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.
आर आर पाटील सोडून गेले. यामुळे एक पोकळी निर्माण झाली होती... भुजबळही नव्हते... अशा गोष्टींमुळे पक्षावर परिणाम होत असल्याचंही अजित पवार यांनी मान्य केलंय.
पाच लाखांच्या जात मुचलक्यावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयानं शुक्रवारी जामीन मंजूर केलाय. यामुळे, तब्बल दोन वर्षांनंतर छगन भुजबळ हे तुरुंगातून बाहेर येणार आहेत. जामीन मंजूर झाला असला तरी, भुजबळांच्या वकिलांना निकालाची प्रत सोमवारी मिळणार असल्यानं सोमवारीच त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची चिन्ह आहेत. सुटका झाल्यानंतर भुजबळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. मार्च २०१६ पासून भुजबळ तुरुंगात आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भुजबळांना अटक करण्यात आली होती. पण मनी लॉन्ड्रिंग कायद्यातलं कलम ४५ (१) रद्द झाल्यानं आज अखेर उच्च न्यायालयानं भुजबळांना जामीन दिला.