प्रभाकर साईलनंतर आणखी एका पंचाचा गौप्यस्फोट, जीवाला धोका असल्याची तक्रार

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा या पंचाने केला आहे

Updated: Oct 27, 2021, 05:18 PM IST
प्रभाकर साईलनंतर आणखी एका पंचाचा गौप्यस्फोट, जीवाला धोका असल्याची तक्रार title=

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात (Mumbai Drug Case) दररोज नवनविन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने केलेल्या आरोपांनंतर आता आणखी एका पंचाने एनसीबीवर धक्कादायक आरोप केला आहे. खारघर इथल्या एका प्रकरणात एनसीबी (NCB) अधिकाऱ्यांनी शेखर कांबळे (Shekhar Kamble) या व्यक्तीला पंच बनवलं आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा शेखर कांबळे यांनी केला आहे.

खारघर इथे ड्रग्स प्रकरणात नायजेरियन नागरिकांना पकडलं होतं. त्यांच्याकडे कुठलंही ड्रग्स सापडलं नव्हतं, पण एनसीबीने त्यांच्याकडे 60 ग्रॅम ड्रग्स सापडल्याचं नमू केलं. या प्रकरणात शेखर कांबळे आणि त्यांच्या एका मित्राला पंच बनवण्यात आलं होतं. या प्रकरणी 8 ते 10 कोऱ्या कागदांवर आपल्या सह्या घेण्यात आल्याचा दावा शेखर कांबळे यांनी केला आहे. 

आता शेखर कांबळे यांनी आपल्या जीवाला धोक असल्याचं म्हटलं आहे. शेखर कांबळे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तशी तक्रार दाखल केली आहे. एनसीबी कार्यालयातून काल आपल्याला फोन करुन कार्यालयात बोलावलं होतं, त्यामुळे आपण घाबरलो असल्याने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचं शेखर कांबळे यांनी म्हटलं आहे. 

प्रभाकर साईलने काय आरोप केलेत
आर्यन खानचं (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने केला आहे. प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाली होती आणि त्यातले 8 कोटी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना दिले जाणार होते असा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला आहे.