मुंबई : सध्या तरुण पिढी व्यायाम आणि शरीर पिळदार करण्याकडे वळली आहे. आपले शरीर पिळदार आणि आकर्षक दिसण्यासाठी अनेक तरूण स्टिरॉईड्स घेतात ज्यामुळे त्यांचे शरीर तर पिळदार होते, परंतु त्याच्यामुळे होणाऱ्या नुकसानाची कल्पना लोकांना नसते. स्टिरॉईड्सचे अनेक दुष्परिणाम आहेत आणि ते वारंवार समोर येत असतानाही व्यायामशाळांमधून किंवा जिममधून त्याची विक्री होते. परंतु आता याला आळा घालण्यासाठी FDAनं आपली कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
प्रसिद्ध मालिका अभिनेता आणि बिग बॉस 13 विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनामुळे त्याचे चाहते हळहळले आहेत. त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजलं नसलं तरी फिटनेस फ्रिक असलेल्या सिद्धार्थ स्टेरॉईड, प्रोटीनचं अतिरिक्त सेवन करत होता का? त्यामुळे त्याचा जीव गेला का? अशी शंका घेतली जाऊ लागली आहे.
परंतु यासगळ्यामुळे आता अन्न औषध प्रशासनही अलर्ट झालं आहे. ज्यामुळे त्यांनी आता जिम्सवर धाडसत्र सुरू केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी औषधांच्या दुकानांमधूनही यादी मागवण्यात आली आहे आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विकलेलं आढळल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
शरीर पिळदार बनवण्यासाठी स्टिरॉईडच्या वापराला भारतात बंदी आहे. मात्र तरीही अनेक तरुण त्याची चोरून खरेदी करत असल्याचं अनेकदा उघड झालंय. काही दिवसांपूर्वीच नॉएडामध्ये आदेश यादव या २३ वर्षीय तरुणाचा अतिरिक्त स्टिरॉईडमुळे मृत्यू झाला होता. तसेच अनेकांना स्टिरॉईडमुळे किडनीचा त्रास जाणवू लागला आहे.
काही जिममध्ये पर्सनल ट्रेनर स्वतःच पावडरचा पुरवठा करत असल्याच्या तक्रारी FDAकडे आल्या आहेत. स्टिरॉईडचा फायदा कमी आणि नुकसानच जास्त आहे. परंतु शरीर पिळदार करण्याच्या नादात अनेकांना ते लक्षात येत नाही आणि जेव्हा लोकांना जाग येते तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. कारण तरुणांना जोपर्यंत त्यापासून मोठे नुकसान होत नाही तोपर्यंत ते या गंभिर समस्येकडे लक्ष देत नाहीत.