मुंबई : परमबीर सिंग यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश कैलाश चांदिवाल यांच्या नेतृत्वाखाली समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतीत 6 महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटी जमा करण्याची सूचना केल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील वरीष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या एका पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली होती. इतकंच नाही तर महाविकासआघाडी सरकार देखील अडचणीत आलं होतं. परमबीर सिंग यांनी हे पत्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून हा खळबळजनक आरोप केला होता.
या पत्रात परमबीर सिंग यांनी म्हटलं होतं की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी एसीपी पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना बोलावून मुंबईत असलेल्या १७५० बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांमधून ४० ते ५० कोटी रुपये गोळा करण्याचे निर्देश दिले होते. पाटील यांनी त्याच दिवशी मला याबाबत माहिती दिली.'
एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या या गंभीर आरोपांमुळे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) हे वादात सापडले आहेत. परमबीर सिंह (Param Bir Singh Letter) यांनी केलेले आरोप अनिल देशमुख यांनी खोडून काढले होते. त्यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं.