कोरोना लसीकरणानंतर मुंबईत पहिला मृत्यू

अतिशय धक्कादायक प्रकार समोर 

Updated: Mar 9, 2021, 08:10 AM IST
 कोरोना लसीकरणानंतर मुंबईत पहिला मृत्यू title=

मुंबई : मुंबईतील दुसऱ्या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसिकरणाला सुरूवात झाली आहे. ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोणता आजार असेल तर आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीला प्राधान्य दिलं जातं आहे. या लसीकरणाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देखील दिला. मात्र आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लसीकरणानंतर मुंबईत पहिला मृत्यू झाला आहे. 

लसीकरणानंतर मुंबईत पहिला मृत्यू 

 अंधेरी येथील कोविड सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. एका ६५ वर्षीय व्यक्तीला लसीकरणानंतर चक्कर आली. त्या व्यक्तीस दुपारी ३.५० च्या सुमारास आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र सायंकाळी ५ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

मुंबईत लसीकरणाला सुरूवात 

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३ लाख ९० हजार ३८ लाभार्थ्यांना लस टोचली आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, गृहमंत्री अनिल देशमुख, महापौर किशोरी पेडणेकर यांसारख्या अनेकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

देशात गेल्या २४ तासांत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांपैकी ८६ टक्के रुग्ण महाराष्ट्रासह सहा राज्यांत आहेत. त्यात केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. सोमवारी कोरोनाचे १८ हजारांहून अधिक रुग्ण आढळले, ९७ जणांचा बळी गेला. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी १२ लाखांवर पोहोचली आहे. महाराष्ट्रामध्ये दर आठवड्याला वाढणारे नव्या रुग्णांचे प्रमाण ११.१३ टक्के असून ते राष्ट्रीय स्तरावरील २.२२९ टक्के इतक्या सरासरीपेक्षा अधिक आहे.