धुळ्यात सत्ताधारी नगरसेवकांवर आंदोलन करण्याची वेळ

सत्ताधारी नगरसेवक कामं होत नाहीत म्हणून आंदोलकांच्या भूमिकेत आहेत. 

Updated: Sep 12, 2020, 07:58 PM IST
धुळ्यात सत्ताधारी नगरसेवकांवर आंदोलन करण्याची वेळ title=
संग्रहित फोटो

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळे महापालिकेत चाललंय काय, हा प्रश्न सर्वसामान्य धुळेकरांना पडलाय. दीड वर्षांपूर्वी धुळेकरांनी भाजपाला स्पष्ट बहुमत दिलं. मात्र आता सत्ताधारी नगरसेवक कामं होत नाहीत म्हणून आंदोलकांच्या भूमिकेत आहेत. नगरसेवकांना काडीची किंमत नाही असा आरोप खुद्दसत्ताधारी नगरसेवकच करत आहेत. 

महापालिकेत काडीचीही किंमत नसल्याची नगरसेवकांची भावना झाली आहे. महापौरांच्या नियुक्तीपासून हे मदभेद प्रकर्षाने चव्हाट्यावर आले आहे. आपल्या प्रभागामधील काम होत नसल्याचा या नगरसेवकांचा आरोप आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य या मुद्द्यांवर जनतेच्या प्रश्नांची उत्तरं सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांकडे नाहीत, अशी स्थिती आहे.

शहरात सुरू असलेलं भूमिगत गटारांचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याची टीका होत आहे. तसंच ठराविक प्रभागांमध्ये जास्त विकासनिधी जात असल्याचाही आरोप होतो आहे.

एरवी महापौर विरुद्ध प्रशासन असं चित्र असतं. मात्र धुळ्याचे महापौर आपल्या नगरसेवकांच्या पाठीशी उभं न राहता प्रशासनाला पाठीशी घालतायेत. जनतेचे प्रश्न धूळ खात पडले असताना सत्ताधारी भाजप घरचीच धुणी धूत असल्याचं चित्र निर्माण झालं असून यात विकासाचे मुद्दे मात्र नगरेआड झाले आहेत.