निष्ठूरतेचा कळस! ग्रामीण रुग्णालयाने गर्भवती महिलेची प्रसूती नाकारली, कारण ऐकून येईल संताप

तिला असाह्य प्रसूती वेदना होत होत्या, पण ग्रामीण रुग्णालायतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी होती... 

Updated: Aug 10, 2022, 02:54 PM IST
निष्ठूरतेचा कळस! ग्रामीण रुग्णालयाने गर्भवती महिलेची प्रसूती नाकारली, कारण ऐकून येईल संताप title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : माणूसकीला काळीमा फासणारी एक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. केवळ आधारकार्ड नसल्याने एका गर्भवती महिलेची प्रसूती ग्रामीण रुग्णालयाने नाकारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यवतमाळच्या मारेगाव इथली ही घटना आहे.

सामाजिक संघटनांच्या मदतीने या गर्भवती महिलेला ताबडतोब वणीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रसूती झाली आहे. अर्चना सोळंके असं गर्भवती महिलेचं नाव असून ती मारेगावच्या आंबेडकर चौकात वास्तव्य करते. 

भटक्या समाजातील हे कुटूंब रस्त्यावर लोखंडी वस्तू तयार करण्याचा व्यवसाय करतात. अर्चनाला प्रसूती कळा सुरू झाल्याने तिला कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालयात नेलं, पण उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्याकडे आधार कार्ड नसल्याचे कारणावरून तिच्यावर उपचार करण्यासाठी नकार दिला. 

असाह्य वेदनेने विव्हळणाऱ्या या महिलेची परिस्थिती बघून जनहित कल्याण संघटना आणि क्रांती युवा संघटनेने तिला वणी इथल्या लोढा हॉस्पिटलमध्ये भरती केलं. दरम्यान महिलेच्या गर्भात शिशुने शौच केल्याने तिची प्रकृती नाजूक झाली होती. मात्र डॉ. महेंद्र लोढा यांनी तिची सुखरूप प्रसूती केली. 

जिल्ह्यात विशेषतः मारेगाव इथं माता बाल मृत्यूचं प्रमाण जास्त असताना पुन्हा ही घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.