यवतमाळ : शासनाचं कृषिवरोधी धोरण, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱयांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्यात.
शेतकरी आत्महत्यांच्या मुद्यावर अनेकांनी सत्तेची फळं चाखली मात्र बळीराजा शेतकरी अजूनही संकटमुक्त झालेला नाही. त्यामुळंच एकाच शेतकरी कुटुंबात आता अनेकांच्या आत्महत्या होऊ लागल्या आहेत. यवतमाळच्या जरूर गावातील उईके कुटुंबात तिसरी शेतकरी आत्महत्या झाल्याने शेतकऱ्यांची विपन्नावस्था अधोरेखित झाली आहे.
यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील जरूर या गावात जनार्दन उईके यांनी विषाचा घोट घेऊन जीवनयात्रा संपविली. जनार्दन हे उईके कुटुंबातील आत्महत्या करणारे तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी जनार्दन यांचे भाऊ अशोक यांनीही कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. त्यानंतर त्यांचा मुलगा सुदर्शन शेतीत राबू लागला मात्र शेती व्यवस्थेत तो देखील टिकू शकला नाही.
नापिकीमुळे झालेल्या नुकसानीमुळे त्यानेही मृत्यूला कवटाळले. या दोन आत्म्हत्यानंतर अशोक यांचे बंधू जनार्दन उईके हे देखील त्यांच्या वाट्याला असलेल्या ३ एकर शेतीत राबून कुटुंबाचा गाडा हाकीत होते. मात्र यंदा त्यांनी घेतलेल्या कपाशीच्या पिकावर बोंडअळीने हल्ला चढविला. उभं पीक नष्ट झाल्याने लागवडीचा खर्च देखील निघू शकला नाही. सोसायटीचे ९० हजारांचे कर्ज, त्यात मुलींचे शिक्षण आणि लग्नाची चिंता या विवंचनेमुळे जनार्दन यांनीही विषाचा घोट घेऊन आत्महत्या केली.
शेतीतल्या नापिकीपायी घरातील दोघांची आत्महत्या पाहिलेल्या उईके कुटुंबातील तिसऱ्या कर्त्या पुरुषानेही आत्महत्या केल्याने उईके कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. अशोकने चार वर्षांपूर्वी तर सुदर्शनने पाच वर्षांपूर्वी मृत्यूला कवटाळले. आता जनार्दनवर संपूर्ण जबाबदारी असताना त्यानेही आत्महत्या केली. कर्जमाफीच्या यादीत त्याचे नाव आहे. मात्र अद्यापही त्याला लाभ मिळालेला नाही.
यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करण्याच्या नावावर करोडो रुपये खर्च करून बळीराजा चेतना अभियान राबविले जात आहे. मात्र खऱ्या अर्थानं हे अभियान राबविल्या जात आहे का? असा प्रश्न शेतकऱयांच्या न थांबणाऱ्या आत्महत्यांनी उपस्थित केला आहे.