जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो... नव्या औषधोपचारामुळे एचआयव्ही संक्रमित रुग्णांच्या मृत्यू प्रमाणात कमी आली आहे, असे असले तरी एड्स ग्रासितांबद्दल समाजात असलेला दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. नव्वदच्या दशकात एचआयव्ही बाधितांसाठी काम करणाऱ्या सुरवातीच्या काही लोकांपैकी एक म्हणजे डॉ. मेघा नवाडे... नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात त्यांनी एचआयव्ही बाधितांसाठी समुपदेशक म्हणून १९९२ पासून कार्य सुरु केले. त्यावेळी 'एड्स' झाला असे निदान झाल्यावर रुग्णाला हात लावण्यासही डॉक्टर तयार नसत... अशा काळात डॉ. मेघा नवाडे यांनी शासकीय मेडिकल रुग्णालयात अनेक एड्सग्रस्तांचे समुपदेशन केले.
१९८१ मध्ये एड्सच्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली होती. तेंव्हापासून पूर्ण जगात ३ कोटी ६० लाख रुग्णांना एचआयव्ही विषाणुंचा संसर्ग झाल्याची नोंद आहे. देशातील एड्सग्रस्तांच्या आकडेवारीत महाराष्ट्र जरी पहिल्या पाचमध्ये नसला तरी राज्यात एड्सग्रस्तांची संख्या मोठी आहे.
- जगात १९८१ पासून ३ कोटी ६० लाख लोकांना एचआयव्हीचा संसर्ग
- १५ वर्षाखालील एचआयव्ही बाधितांची संख्या १८ लाख
- १५ ते २४ वयोगटात ३७ टक्के एचआयव्ही बाधित
- देशात सर्वाधिक एचआयव्हीग्रस्त राज्य आहेत मिझोरम, नागालँड, तेलंगाना, आंध्रप्रदेश
- २०१० पासून एड्सग्रस्तांच्या मृत्यूमध्ये ३४ टक्के कमी आलीय
- पण याच कालावधीत १८ लाख नवीन संसर्गाची नोंद
- एड्सग्रस्तांसाठी देशभरात ५५० एआरटी केंद्रातून ११ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात येतो
समलैंगिक, तृतीयपंथी यांच्यात एचआयव्ही बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे एड्सबाबत अधिक व्यापक जागृती करण्याची गरज आहे. आपली स्थिती जाणून घ्या म्हणजेच know Your Status ही या वर्षीच्या एड्स दिनाची थीम आहे... प्रत्येक व्यक्तीने स्वतःची तपासणी करणे आवश्यक आहे हे या माध्यमातून निदर्शनात आणायचे आहे... नवीन औषधोपचारमुळे मृत्यूच्या प्रमाणात कमतरता आली आहे... तरीही एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये याकरिता जनजागृतीची मोठी गरज आहे.