विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादमध्ये दोन गटांतील वादानंतर शहरात उसळलेल्या दंगलीत दोघांचा मृत्यू झालाय... तर दगडफेकीमध्ये १५ जण जखमी झालेत. तूर्तास शहरात तणावपूर्ण शांतता आहे. आगीत भस्मसात झालेली दुकानं.... गाड्यांची झालेली राखरांगोळी... रस्त्यांवर पडलेला दगडांचा खच... ही दृश्यं सध्या औरंगाबादमध्ये दिसत आहेत. इथल्या गांधीनगर, राजाबाजार आणि शहागंज भागात शुक्रवारी सायंकाळपासून जाळपोळ आणि दगडफेक सुरू झाली. दोन गटातल्या या वादाचं पर्यवसान दंगलीत झालं.
अफवांचे पेव फुटू लागले... कुणी मशिदीची भिंत तोडल्याची अफवा पसरवली... तर काहींनी दुकानांची जाळपोळ सुरू झाल्याचे मेसेज फिरवले... बघता बघता भडका पेटला... जाळपोळ आणि दगडफेकीत एका वृद्ध दिव्यांगासह दोघांचा मृत्यू झाला... दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना जमावबंदी लागू करावी लागली... इथं आता तणावपूर्ण शांतता असली तरी दगडफेक आणि जाळपोळीच्या खुणा स्पष्ट दिसतायत...
- आठ दिवसांपूर्वी पहिली ठिणगी पडली. सरदार वल्लभभाई पुतळा आणि ऐतिहासिक घडाळ्याच्या नूतनीकरणासाठी तीन कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. त्यासाठी शहागंज भागातील टपऱ्या हलवण्याची गरज होती. त्यावरून पहिल्यांदा वाद सुरू झाला.
- शहागंज भागात व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर काही हातगाड्या लावल्या जात होत्या. लक्ष्मीनारायण बखरिया ऊर्फ लचू पैलवान यांची कन्या असलेल्या स्थानिक नगरसेविका यशश्री बखरिया यांनी त्या हातगाड्या हटवण्याची मागणी पालिकेकडं केली. त्यावरून वाद झाला.
- ५ दिवसांपूर्वी शहागंज भागातील एका व्यक्तीनं आंबे खरेदी केले... आंबे खराब निघाल्यानंतर ते बदलून देण्यावरून वाद झाला.
- त्यातच शुक्रवारी मोती कारंजा भागात महापालिकेनं नळ कापले... त्यावरून पुन्हा वाद होऊन संध्याकाळी दोन गटात हाणामारी सुरू झाली... आणि दंगलीचा भडका पेटला...
दरम्यान, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. तर परिस्थिती हाताळण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय... तर औरंगाबाद दंगलीला जबाबदार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
या दंगलीला कोण जबाबदार? याचं वास्तव चौकशीनंतर समोर येईलच... पण कोणत्याही दंगलीत सामान्य माणसंच भरडली जातात, हे वास्तव आपण कधी समजून घेणार?