मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची नुकतीच पगारवाढ करण्यात आलीय. पण तरीही दिवाकर रावतेंविरोधात कर्मचाऱ्यांची नाराजी आहे. त्यामुळेच एसटीचा हा अचानक संप पुकारण्यात आलाय. रावतेंविरोधात एसटी कर्मचारी नाराज आहेत.
परळ बस डेपोमधून दररोज किमान १०० ते २०० बस ये-जा करत असतात. पण अचानक एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे ही वाहतूक ठप्प आहे. त्यामुळं प्रवाशांचे मोठे हाल होतायत.
सांगलीमध्येही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
रायगडमध्ये कर्जत, माणगावमधून एकही एसटी बस सुटली नाही. तर जिल्ह्यात काही ठिकाणी मात्र एसटी सेवा सुरू आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम रत्नागिरीतही जाणवतोय. रत्नागिरीतल्या एसटी स्थानकावरही प्रवाशांचे प्रचंड हाल होतायत.
एसटी कर्मचार्यांनी घोषित केलेल्या संपाचा भंडारा मध्ये सकाळ पासूनच प्रभाव पाहायला मिळत आहे आहे. रात्री अचानक संप पुकारल्याने आणि प्रवाशांना या विषयी माहिती नसल्याने प्रवासी स्थानकावर आल्यावर त्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.
एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या अघोषित संपावर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संपकऱ्यांवर कारवाईचा निर्णय लवकरच एसटी प्रशासन घेईल आणि संपकऱ्यांना कुणी चिथावणी देत असेल तर ते अयोग्य असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलंय.