मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : भल्या पहाटे कधी अर्धनग्नावस्थेत तर कधी नाईट गाऊनमध्ये फिरणाऱ्या तरुणामुळे नाशिक शहरातल्या महिला प्रचंड धास्तावल्यात. महागडी गाडी घेऊन येणाऱ्या या तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला असता, धक्कादायक माहिती समोर आली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी ही दृश्यं आहेत पहाटे साडेचार साडेपाचच्या दरम्यानची. नाशिक शहरातल्या अंबड पोलीस ठाणे हद्दीतल्या स्वामी विवेकानंद नगर भागात, गेल्या १५-२० दिवसांपासून रोज सकाळी एका महागड्या गाडीतून एक तरुण येतो. कधी त्यच्या अंगात थ्री फोर्थ असते, तर कधी गाऊन असतो. पाणी भरणा-या महिलांजवळ तो थांबतो. यामुळे इथल्या महिला दडपणाखाली आहेत. त्याला पकडण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला, मात्र गाडीतून धूम ठोकून तो पळून गेला.
तक्रारीवरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. तेव्हा मुळचा नोएडाचा हा उच्चशिक्षित तरुण, नाशिकमध्ये एका खासगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असल्याचं समोर आलं. काही वर्षांपूर्वीच्या अपघातामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडली असून, आजारपणाच्या झटक्यावेळी तो काय करतो हे त्याला कळत नसल्याचं तपासात दिसून आलंय.
आपल्य्या मित्रासोबत राजीव नगरमध्ये राहणारा हा तरुण आजारपणाच्या झटक्यात नेमकी गाडी कशी चालवतो आणि लोक पकडायला आले की पळून कसा जातो हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.