पुणे : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackarey ) यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी मोठा गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर ( Shridhar Patankar ) आणि बिमल अग्रवाल ( Bimal Agrawal ) यांचे व्यावसायिक संबंध आहेत. याच बिमल अग्रवाल यांनी बुलेटप्रुफ जॅकेट घोटाळा केला होता आणि त्याच जॅकेटमुळे पोलीस अधिकारी हेमंत करकरे ( Hemant Karkare ) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांचे दाऊदशी संबंधित व्यक्तींशी संबंध आहेच. पण, त्यात शिवसेनाही मागे नाही. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांनी निकृष्ट जॅकेट घातले होते. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला.
मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव ( Yashwant Jadhav ) हे बिमल अग्रवाल यांचे पार्टनर होते. अग्रवाल यांचा बुलेटप्रूफ जॅकेट घोटाळा कुप्रसिद्ध आहे. कसाब प्रकरणानंतर हा घोटाळा उघडकीस आला. याच बिमल अग्रवाल यांचे श्रीधर पाटणकर यांच्याशीही व्यावसायिक संबंध आहेत.
बिमल अग्रवाल यांची यशवंत जाधव यांच्याशी भागीदारी केली. समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स असे त्यांच्या कंपनीचं नाव आहे. या भागीदारी कंपनीने बद्री इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांच्याकडून ८० कोटी रुपयांची मलबार हिल येथे मालमत्ता विकत घेतली.
समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स या कंपनीचे उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्याशी आर्थिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. यावरून उद्धव ठाकरे, यशवंत जाधव, बिमल अग्रवाल, श्रीधर पाटणकर यांचे आपआपसांत व्यावसायिक संबंध आहेत असे सिद्ध होत असल्याचे सोमय्या म्हणाले.