Maharashtra Weather Alert: जुलैमध्ये पावसाने सरासरी गाठली होती. मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मागील आठवड्यापासून कोकणात पावसाचा जोर मंदावला आहे. यापुढेही कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, मध्य महाराष्ट्रात पाऊस समाधानकारक असेल.
जुलैमध्ये कोकणासह घाट माथ्यावर पावसाने चांगलाच जोर धरला होता. कोकणातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती तर पुण्यातही पूराने थैमान घातले होते. जुलैमध्ये झालेल्या पावसाने राज्यातील 90 टक्के धरणे तुडुंब भरली आहेत. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी असणार आहे. तर, सप्टेंबरमध्येही अशीच स्थिती असणार आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. तर, 15 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोरही कमी असणार आहे. पुढील आठवड्यात मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असणार आहे.
पुढील आठवड्यात कोकणात फारसा पाऊस नसणार आहे. तर, कोकणात काही जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर, मराठवाड्यात मात्र पावसाची श्क्यता नाही. दक्षिण कोकणात 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मागील आठवड्यात पावसाने लोणावळ्यात हाहाकार केला होता. अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचून अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी गेले होते. त्यामुळे लोणावळ्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र विकेंडला पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने पर्यटकांना पावसाची ही पर्वणी मिळणार आहे. मागील 24 तासात 36 मिमी पाऊस झाला आहे. देशभरातील पर्यटक हे वर्षाविहारासाठी लोणावळ्यात दाखल होतात. त्यामुळे पुन्हा पावसाच्या सरी अंगावर घेऊन पर्यटन करण्याचा वेगळा आनंद पर्यटकांना मिळणार आहे.