विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग : डिसेंबरची थंडी दिवसेंदिवस वाढत चाललीय. काही दिवसांत नाताळच्या बेल्स वाजायला लागतील आणि सुट्ट्यांचा हंगाम सुरू होईल.... सुट्टी साजरी करण्यासाठी कोकणात एक नवा पर्याय तुमच्यासाठी खुला झालाय.
ख्रिसमसच्या सुट्टीत किंवा थर्टी फर्स्टला कुठे जायचं, याचं प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासमोर एक मस्त पर्याय उभा आहे... आपल्या कोकणातल्या मालवणात हे नवं वॉटर पार्क उभं राहिलंय... मालवण तसं पर्यटकांचा पाहुणचार नेहमीच हसतमुखानं करत असतं... मालवणातलं पर्यटन आणखी कसं वाढवता येईल, असं इथल्या तरुणांना वाटलं आणि वॉटर पार्कची कल्पना सुचली.
मालवणमधले चाळीस तरुण एकत्र आले आणि पाण्यात धमाल मस्ती करण्यासाठीचं वॉटरपार्क उभारण्याचं ठरलं... प्रत्येकानं शक्य तेवढे पैसे दिले आणि मालवणच्या समुद्रात हे भव्य वॉटरपार्क तरंगू लागलं...
राज्यातले इतर वॉटर पार्कस कृत्रिमरित्या तयार केलेली आहेत. पण समुद्रातलं वॉटरपार्क हे पहिलंच आहे... सध्या प्रायोगित तत्वावर हे वॉटर पार्स सुरू झालंय... पण त्याचे नेमके दर अजून ठरलेले नाहीत.
कोकणात पर्यटन विकासासाठी बरीच क्षमता आहे... मात्र, म्हणावा तेवढा पर्यटन विकास अजूनही कोकणाचा झालेला नाही. पर्यटनाला सरकार चालना देईल, याची वाट न पाहता मालवणमधल्या तरुणांनी हे वॉटरपार्क उभारुन दाखवलंय. त्यातून पर्यटकांना आनंदही मिळणार आहे आणि स्थानिकांना रोजगार...... तेव्हा येवा कोकण आपलाच असा.... कोकणातल्या या वॉटर पार्कमध्ये मजा करा... पण खेळताना स्वतःची काळजीही घ्या....