पुणे : अति घाई संकटात नेई, असा प्रकार पुण्यात घडला आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला असताना, सफाई करताना काही वस्तू उघडून न पाहता त्यांना थेट कचरा पेटी दाखवण्याची घाई काहींना लागलेली असते. पण असं करताना थोडं थांबा, जुन्या वस्तू नीट उघडून पाहा. कारण एका सासूने सुनेसाठी बनवलेले सोन्या - चांदीचे दागिने पर्ससह कचऱ्याच्या घंटागाडीत टाकून दिले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने सफाई कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
या महिलेने मोशी येथे संपर्क साधला. कारण या महिलेला माहिती मिळाली की, रविवारी गोळा झालेला कचरा हा मोशी कचरा डेपोत खाली करण्यात आला. दिवाळीची साफ सफाई सुरु असताना जुनी पर्स वापरात नाही, म्हणून या महिलेने ही पर्स तशीच कचऱ्यात टाकून दिली आणि नंतर हा प्रकार लक्षात आला. या महिलेचे ५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने या पर्ससह कचऱ्यात गेले.
पुढे ही माहिती मोशी कचरा डेपोत देण्यात आली. तेथील सफाई कर्मचारी हेमंत लखन यांनी संबंधित महिलेला समक्ष बोलवलं. महिलेच्या समोरच १८ टन कचऱ्यातून अखेर पर्स शोधून दिली. यात ५ ग्रॅम सोन्याचे पेंडल आणि चांदीचे जोडवे त्यांना परत करण्यात आले.
सोने चांदी किती आहे, हे महत्त्वाचे नाही, त्या महिलेने कष्टाच्या पैशातून सुनेसाठी सोने बनवले आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी ते महत्त्वाचे आहे, असं हेमंत लखन यांनी म्हटलं आहे.