गणेश मोहोळ, झी मीडिया, वाशिम : राज्यात सध्या पोलीस विभागात रिक्त असलेल्या पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया (Police Recruitment) सुरू आहे. मुंबई पोलिस (Mumbai Police) दलासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत मूळचा वाशिम (Washim) जिल्ह्यातील काजळंबा इथला रहिवासी असलेला 27 वर्षीय गणेश उगले भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता. पोलीस होण्याचं स्वप्न त्याने पाहिलं होतं. पोलीस भरती प्रक्रियेसाठी त्याने जोरदार तयारी केली होती. पण त्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं.
शुक्रवारी सकाळी तो कलिना विद्यापीठाच्या मैदानावर चाचणीसाठी उतरला. त्याने 1600 मीटरची धावण्याची चाचणी पूर्ण केली आणि अंतिम रेषा ओलांडल्यानंतर लगेचच जमिनीवर कोसळला. भरती प्रक्रियेसाठी उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने तात्काळ त्याला उपचारांसाठी सांताक्रूझ इथल्या व्हीएन देसाई रुग्णालयात दाखल केलं. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर गावकऱ्यांना धक्का बसला असून या युवकांच्या मृत्यूने गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस भरतीसाठी आला होता मुंबईत
गणेश उगले आपल्या आत्येभावासोबत पोलीस भरतीसाठी मुंबईत आला होता. शुक्रवारी मैदानी परीक्षा होती, गणेश गुरुवारी रात्री मुंबईत आला आणि आपल्या मित्राकडे थांबला होता. सकाळी मैदानी परीक्षेला निघण्याआधी त्याने केवळ नाष्टा केला होता.
गणेशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा मृतदेह वाशीम येथे नेण्यात येणार असल्याचे ही सांगण्यात आले. सकाळपासून त्याला तब्येतीबाबत कोणतीच तक्रार नव्हती. पण अचानक 1600 मीटरची धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर तो जागेवरच कोसळला. गणेशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा मृतदेह वाशीम इथे पाठवण्यात आला.