पावसा, खुल्या दिलानं तुझं स्वागत!

पावसाला दमदार सुरूवात 

मुंबई : अखेर मुंबईसह महाराष्ट्रात अधिकृत पावसाचं आगमन झालं आहे. शेतकरी, शहरी माणसं, प्राणी, पक्षी अगदी सगळेच या पावसाच्या आगमनाने सुखावले आहेत. प्रत्येकाला भरभरून आनंद देणारा हा ऋतू निसर्गात हिरवी चादर पांघरतो. पावसामुळे सगळीकडेच एक उत्साह आहे. या पावसाचं स्वागत झी चोवीस तासने अनोख्या पद्धतीने केलं आहे. 

ज्याची इतके दिवस वाट पाहात होतो, त्या पाहुण्यानं अखेर महाराष्ट्र गाठलाय़..... महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय. तुझं खुल्या दिलानं स्वागत...... तुझ्या येण्याची चाहूल लागली की सगळ्यांच्याच मनात स्वप्नांचे कोंब फुटायला लागतात.... अवघ्या सृष्टीची ओल्या श्रृंगारासाठी लगबग सुरू होते.... पहिली आशेची पालवी फुटते ती आमच्या शेतकऱ्याच्या मनात..... यंदा तरी तू शिस्तीत बरसशील आणि त्याच्या शेतात कुबेराचं धन पिकेल, या स्वप्नांसह त्याचं जगणंही तो शेतात रुजवतो.... त्याच्या विश्वासाला जाग.... त्यानं जलयुक्त शिवारासाठी केलेल्या मेहनतीला न्याय दे..........यंदाच्या पावसाळ्यात तरी शेकडो मायमाऊल्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरु दे.... 

अर्थव्यवस्थेला बळकटी द्यायला ये....  भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात तुझा वाटा १५ टक्क्यांचा........आमच्या देशातल्या तब्बल ८० कोटी लोकांचं जगणं तुझ्याशी बांधलं गेलंय.....त्यांच्या घरची चूल तुझ्या भरवशावर पेटते... अर्थकारणच काय, यंदा तर अवघं सत्ताकारण तुझ्याभोवती गुंफलं गेलंय..... पुढच्या वर्षी कमळाचं फुलणं किंवा कोमेजणं बहुतांशी तुझ्यावरच अवलंबून आहे..... मुंबईत तर कधी नव्हे एवढं खोदून ठेवलंय.... गतिमान मुंबईच्या विकासाची स्वप्नं त्या खोदकामात पेरुन ठेवलीयत.... नेहमीप्रमाणे महापालिकेची, रेल्वेची परीक्षा बघायला ये.... मिलन सबवे आणि हिंदमाताची दरवर्षीची पाणीदार होण्याची हौस पुरी करायला ये..... 

एकदा मुक्कामाला आलास की सगळ्यात आधी धरणांचे, तलावाचे पत्ते शोध.... तिथं दिल खोलके बरस.... नद्या बाळसं धरू देत..... वाड्यावस्त्यांवरची लेकरं तहानलेली ठेवू नको.... एखाद दिवशी शाळेभोवती तळं साचून सुट्टीही मिळू दे.... प्रेमात पडलेल्यांसाठी अचानक ये आणि एका छत्रीत त्यांना भिजू दे....तुझ्यासोबतचा एखादा ओलाचिंब सेल्फी फेसबुकवर पोस्ट होऊ दे....तुझ्या थंडगार थेंबांच्या स्पर्शासह सारे दाह विरू देत.... सृष्टीच्या सुर्जनासाठी ये.... गरमागरम वाफाळलेल्या आल्याच्या चहासाठी ये..... गरमागरम कांदा भजींसाठी ये....... तुझ्या स्वागताला असंख्य सोनस्वप्नांची तोरणं बांधलीयत..... नव्या सर्जनासाठी ये.......