जमिनीतून लाव्हारस निघाल्याच्या व्हायरल व्हिडिओमागचे सत्य

जमिनीतून लाव्हारस निघत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

Updated: Jun 9, 2019, 04:38 PM IST
जमिनीतून लाव्हारस निघाल्याच्या व्हायरल व्हिडिओमागचे सत्य title=

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेडमध्ये ज्वालामुखीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. बोअरवेलमधून लाव्हारस बाहेर पडतो अशा आशयाने व्हिडिओ समाज माध्यांमध्ये व्हायरल झाला. या व्हिडिओबाबत एकच उत्सुकता निर्माण झाली. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जांभरुण गावात हा प्रकार घडला. तुकाराम किरकण यांच्या शेतात अचानक सकाळच्या सुमारास जमिनीतुन तप्त रस बाहेर पडु लागला. जमिनीतुन ३ ते ४ तास हा रस बाहेर पडण्याचा प्रकार सुरु होता. अचानक जमिनीतुन असा तप्त रस बाहेर पडत असल्याने शेतमालक आणि ग्रामस्थ हैराण झाले. जमिनीतुन लाव्हारस निघत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. बघ्यांची गर्दी जमु लागली. बोअरवेलमधुन हा लाव्हारस बाहेर निघतोय अशा आशयाने हा व्हिडिओ व्हायरल झाला. खरच जमिनीतून लाव्हारस निघतोय का याची पडताळणी करण्यासाठी झी २४ तासने स्वामी रामानंद तिर्थ विद्याठातील भुगर्भ तज्ञासोबत घटनास्थळ गाठले. 

ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्याच्या अगदी १ फुट अंतरावर विजेचा लोखंडी खांब आहे. या खांबावर विज पडली आणि ती खांबातुन जमिनीत शिरली. विजेच्या प्रचंड उष्णतेमुळे खांबाखालील दगड, मुरुम, माती जळुन त्याचा तप्त रस तयार झाला. आणि हा रस जमिनीतुन अशाप्रकारे बाहेर आल्याचे स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठाचे भुगर्भ तज्ञ प्रोफेसर डॉ. डी.बी. पाणसकर यांनी सांगितले. 

नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रात कुठेही ज्वालामुखी सक्रीय होण्यासारखी अजिबात परिस्थीती नसल्याचे भुगर्भ तज्ञांनी स्पष्ट केले. 

बीडमध्ये अशाच दोन घटना अलीकडेच घडल्या होत्या. त्यामुळे अशा घटनांमुळे घाबरून जाऊ नये. तसेच एखादा व्हिडिओ व्हायरल करण्याआधी त्याची सत्यता तपासणी करणे गरजेचे आहे.