सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : हिमाचल प्रदेशातील 'मनाली' ते जम्मू-काश्मीरमधील 'लेह' हा ४८५ किलोमीटरचा अत्यंत खडतर प्रवास एका मराठमोळ्या तरुणाने एकट्याने आणि तोही चालत पूर्ण केलाय. हजारो फूट उंच डोंगर, क्षणाक्षणाला बदलते हवामान या सर्व परिस्थितीत या तरुण ट्रॅव्हलरने आपला प्रवास पूर्ण केला.
विकास कपाळे असं या तरुणाचं नाव... विकास सध्या दिल्ली युनिव्हर्सिटी बॅचलर ऑफ मॅथेमॅटिक्सचं शिक्षण घेतोय. निसर्गावर मनापासून प्रेम करणारा, शेकडो मैल एकट्यानं नवनवीन प्रदेश फिरणारा नांदेडमधला अवलिया... नुकतंच त्यानं हिमाचल प्रदेशातील मनाली ते लेह असा ४८५ किलोमीटरचा प्रवास पायी केलाय आणि तोही १७ दिवसांमध्ये... डोंगराळ प्रदेश, क्षणाक्षणात बदलणारं तापमान, ऑक्सिजनची कमतरता... मात्र अशा खडतर वातावरणातही विकासनं आपला प्रवास पूर्ण केला. आत्मविश्वासाच्या जोरावर त्यानं सर्व अडचणींवर मात केली. आपला प्रवास त्यानं अॅक्शन कॅमेऱ्यानं टिपलीय.
दिवसभर चालायचं... रात्री तंबू टाकून झोपायचं... अत्यंत कमी जेवायचं... अशा प्रकारे विकासनं ४८५ किलोमीटर अंतर कापलं... या प्रवासात त्याला सोबत होती ती निसर्गाची... वाटेत त्याला अनेक जण भेटले मात्र ते ग्रुपसोबत...
नवनवीन प्रदेश, त्या ठिकाणची संस्कृती, सौंदर्य पाहत, निसर्गाशी एकरुप होत त्यानं हा प्रवास पूर्ण केला. विकासची ही जिद्द... त्याचा थरारक प्रवास सध्या नांदेडकरांसाठी कौतुकाचा विषय बनलाय...