वियजसिंह मोहिते पाटील यांचा भाजपा प्रवेश नक्की?

प्रचारसभेवेळी सभेच्या स्टेजवर विजयसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती

Updated: Apr 17, 2019, 12:05 PM IST
वियजसिंह मोहिते पाटील यांचा भाजपा प्रवेश नक्की? title=

सोलापूर : पंतप्रधान मोदींची आज अकलूजमध्ये सभा होणार आहे. पंतप्रधान मोदींची रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी प्रचारसभा होणार आहे. मात्र आज या प्रचारसभेवेळी सभेच्या स्टेजवर विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित आहेत. या प्रचारसभेमध्ये वियजसिंह मोहिते पाटील यांनी सहभाग घेतल्याने आज भाजपमधील त्यांचा प्रवेश निश्चित असल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार सुधाकरपंत परिचारकही स्टेजवर उपस्थित आहेत. 

माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ओळखला जातो. माढा मतदारसंघासाठी पंतप्रधान मोदींची ही महत्त्वपूर्ण प्रचारसभा असणार आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यानंतर रणजितसिंह निंबाळकरांना मिळालेली उमेदवारी यामुळे माढाकडे सर्वाचेच लक्ष सागले आहे. अकलूजमधील या सभेसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमलेली आहे. 

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता खासदार विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपाच्या मार्गावर असण्याची चर्चा आहे. माढा मतदारसंघातील प्रचारसभेत विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाग घेतल्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. अकलूजमधील सभेसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल, त्यांचे पती आमदार राहुल कुल, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पंढरपूरचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, भाजप आणि शिवसेनेच्या माढा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेते उपस्थित आहेत.