Vidhan Parishad: मविआचं जागावाटप ठरलं! ठाकरे-काँग्रेसचा फ्लॉर्म्युला फायनल; महायुतीचा गोंधळ कायम

Vidhan Parishad Graduate Constituency And Teachers Constituency Election: मंगळवारी महाविकास आघाडीमधील नाराजी उघडपणे समोर आली होती. दुसरीकडे महायुतीमधील गोंधळही समोर आला होता. असं असतानाच आता महाविकास आघाडीने यावर तोडगा काढला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 12, 2024, 11:59 AM IST
Vidhan Parishad: मविआचं जागावाटप ठरलं! ठाकरे-काँग्रेसचा फ्लॉर्म्युला फायनल; महायुतीचा गोंधळ कायम title=
महाविकास आघाडीचा तिढा सुटला

Vidhan Parishad Graduate Constituency And Teachers Constituency Election: विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतरादरसंघांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमधील तिढा सुटला आहे. उद्धव ठाकरे गटाने परस्पर चार उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती. ठाकरे गटाने उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसने केली होती. काँग्रेसच्या मागणीला मान देऊन ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या जागेवरुन ठाकरे गट निवडणूक लढण्यावर ठाम असून कोकण मतदारसंघातून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून कोकणामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढणार आहे.

महाविकास आघाडीत नेमकी काय तडजोड झाली?

महाविकास आघाडीमधील तिढा सोडवण्यासाठी झालेल्या तडजोडीनुसार नाशिकची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला तर कोकणची जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. नाशिकमधून ठाकरे गटाचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे निवडणूक लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. नाशिकमधून काँग्रेसचे दिलीप पाटील माघार घेणार आहेत. तर या मोबदल्यात कोकणामधून ठाकरे गटाचे किशोर जैन माघार घेत आहेत. कोकणातून काँग्रेसचे रमेश कीर निवडणूक लढवणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवल्याने विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतरादरसंघांच्या निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीने एकत्र लढावं असे प्रयत्न मागील अनेक दिवसांपासून सुरु होते. या वाटाघाटीमुळे महाविकास आघाडी आता एकत्र निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

महायुतीचा गोंधळ कायम

महाविकास आघाडीबरोबरच महायुतीतही विधानपरिषद निवडणुकीत मतभेद दिसून येत आहेत. या निवडणुकीत महायुतीतील पक्षांनी आमने- सामने उमेदवार दिले आहेत. भाजपानं विधान परिषदेसाठी परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. मुंबई पदवीधर शिंदे गटाचे डॉ. दीपक सावंत आणि भाजपाचे किरण शेलार यांनी अर्ज भरले आहेत. या ठिकाणी शिंदे गटाने माघार घ्यावी यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाचे निरंजन डावखरेंविरोधात शिंदे गटाचे संजय मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये शिक्षकमतदारसंघात शिंदे गाटच्या विरोधात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भावानेच उमेदवारी भरला आहे. दोन्हीकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात ताठर भूमिका घेण्यात आल्याने अखेर या प्रकरणात दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष घालण्याची विनंती केल्याचं समजत आहे. 

मुंबईतही महायुतीचा गोंधळ

नाशिक शिक्षक मतदारसंघातून अजित पवार गटाकडून ॲड. महेंद्र भावसार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर याच मतदारसंघातून शिंदे गटाच्या किशोर दराडे यांनी अर्ज भरला आहे. या ठिकाणी भाजपने आपला उमेदवार दिला नसला तरी विखे-पाटील यांच्या सख्या भावाने राजेंद्र विखे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याशिवाय विवेक कोल्हे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ भाजपचे निरंजन डावखरे आणि शिंदे गटाचे संजय मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडेंनी अर्ज केला आहे. तर याच मतदारसंघातून शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे रिंगणात आहेत. भाजपाच्या शिवनाथ दराडे यांनीही या मतदारसंघातून अर्ज भरला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातही शिंदे गटाचे  दीपक सावंत आणि भाजपाचे किरण शेलार आमने-सामने आहेत.