ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर काळाच्या पडद्याआड

त्या ८६ वर्षांच्या होत्या... 

Updated: Nov 1, 2019, 10:09 AM IST
ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर काळाच्या पडद्याआड  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : साहित्य विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या आणि बालसाहित्यिका, कथाकथनकार अशी ओळख असणाऱ्या गिरिजा कीर यांचं गुरुवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनापश्चात दोन मुलं आणि सूना असा परिवार आहे. गिरिजा कीर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे, शिवाय आपण एका उत्तम साहित्यीकेला मुकलो आहोत अशी साहित्य जगतातून व्यक्त केली जात आहे. 

गिरिजा कीर यांनी साहित्य क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत जवळपास ११५ पुस्तकं लिहिली. बालसाहित्यातील त्यांचं योगदान विशेष उल्लेखनीय ठरलं. समाजातील विविध वर्गांना अगदी जवळून अभ्यासत त्यांनी कायम आपल्या लेखणीच्या माध्यमातून ही वर्णनं अतीव प्रत्ययकारीपणे लिहिली. 

'गिरिजाघर', 'देवकुमार', 'चांदण्याचं झाड', 'चंद्रलिंपी', 'चक्रवेद', 'स्वप्नात चंद्र ज्याच्या', 'आभाळमाया', 'आत्मभाग', 'झपाटलेला' या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांचं 'जन्मठेप' हे पुस्तक अलिकडेच प्रसिद्ध झालं होतं. १९६८ ते १९७८ या काळात 'अनुराधा' मासिकाची साहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. साहित्य आणि लेखनविश्वात त्यांच्या या योगदानासाठी त्यांना बऱ्याच पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं होतं.