श्रावणमास आरंभीच भाज्यांचे दर कडाडले; पाहा अंदाजे किती पैसे मोजावे लागू शकतात

मेथी आणि कोथिंबीरीच्या एका जुडीचे दर....

Updated: Jul 22, 2020, 07:00 AM IST
श्रावणमास आरंभीच भाज्यांचे दर कडाडले; पाहा अंदाजे किती पैसे मोजावे लागू शकतात  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : सण- उत्सवांचं पर्व मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी हर्षोल्हास आणि सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. असं असतानाच पुढच्या साधारण महिन्याभराच्या कालावधीसाठी किंवा त्याहूनही अधिक दिवसांसाठी सातत्यानं शाकाहारी जेवणाकडे वळणाऱ्यांसाठी एक चिंतेची बाब समोर आली आहे. ही बाब आहे कडाडलेल्या भाजीपाल्याच्या दरांची. 

CORONAVIRUS कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं श्रावणाच्या पहिल्याच दिवशी भाज्यांच्या दरांनी कमालीची उंची गाठल्याचं पाहायला मिळालं. श्रावण महिन्याच्या सुरुवातीसोबत भाज्यांचे दर जवळपास ५० टक्क्यांनी वाढल्याचं पाहायला मिळालं. कोरोनामुळं भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळं वाहतुकीचा खर्चही वाढला आहे, या साऱ्याच्या परिणामार्थ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसू लागली आहे. 

कोरोनामुळं राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यातही जितका भाजीपाला बाजारपेठांमध्ये येतो त्याच्या वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर प्रति किलोमागे शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. 

एरव्ही खिशाला परवडेल अशाच किंमतीत मिळणारी शिमला मिरची १००-१२० रुपये किलो, गवार १०० रुपये किलो, मटार १२० रुपये किलो, भेंडी ८० रुपये किलो, टोमॅटो ८० रुपये किलो, फ्लॉव्हर ९० रुपये किलो, कोबी ८० रुपये किलो, मेथीची एक जुडी ४० रुपये किलो अशा घरांत पोहोचली आहे. इतकंच नव्हे, तर कोथिंबीरीच्या एका जुडीसाठी आता ५०-७० रुपये मोजावे लागत आहेत.

ऐन श्रावणातच भाज्यांच्या दरांमध्ये आलेली ही उसळी ग्राहकांना घाम फोडत आहे. पण, येत्या काही दिवसांमध्ये आता याच श्रावण महिन्यामुळं भाजीपाल्याची आवक वाढून पानात येणारी भाजी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशीच आशा आहे.