मुंबई : कधी अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्याला सतत संकटाला सामोरे जावं लागत आहे. आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा रडवलं आहे. वातावरणातील बदलाचा फटका यंदा सर्वच हंगामातील पिकांना बसलेला आहे. आता खरीप-रब्बी हंगामानंतर फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलं आहे.
पिकं आणि फळबागा अंतिम टप्प्यात असतानाच अवकाळी पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम झाला आहे. खरिपातही सोयाबीन, तुर, कापूस या पिकांचे नुकसान पावसामुळेच झाले होते. तर आता रब्बी हंगामावरही पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम होत आहे.
मुंबईसह नवी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगाळ हवा आणि अवकाळी पावसामुळे फ्लॉवर, कांदा, द्राक्ष ही पिकं संकटात आहेत. पिकांवर रोगाचं प्रमाण वाढलंय.
नाशिक जिल्ह्यात सकाळपासून पावसानं हजेरी लावलीये. पाऊश आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. तर द्राक्षांप्रमाणेच टोमॅटोलाही पावसाचा फटका बसलाय. टॉमॅटो शंभरीवर गेला असताना शेतक-यांना चांगला पैसा हाती लागण्याची आशा होती. मात्र पावसामुळे काढणीला आलेला टोमॅटो खराब होतोय. तर ढगाळ वातावरणामुळे कांद्यालाही दणका दिलाय... येवल्यातील कांदा उत्पादकांना नुकसान टाळण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागतेय.
अवकाळी पावसामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या तूर पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या तूर फुलोर्यात तर कुठे शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे, अशा स्थितीत तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढली आहे. याचा मोठा परिणाम उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. या वातावरणाचा फटका सोयाबीन, उडीद आणि मूग या पिकांवरही बसण्याचे चिन्ह आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधून मधून अवकाळी पाऊस होतोय. त्यामुळे आंबा आणि काजू पिकावर त्याचा परिणाम झालाय. दिवाळीच्या दरम्यान कोकणात थंडीची चाहूल लागली होती. त्यानंतर चांगला मोहोर आला. मात्र पुन्हा एकदा पाऊस झाल्यानं आंब्यावर तुडतुड्या आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय.