Maharashtra Unseasonal Rains farm damage : राज्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे हातचे पिक वाया गेले आहे. अवकाळी पावसामुळे काही जिल्ह्यांत पिकांचं मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. दरम्यान, आज सकाळपासून मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक भागात हवामानात बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरात मोका वादळ निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात आठवडाभर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडेल.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 43 गावातील 33 टक्के पिकांचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून, एक हजार 280 हेक्टरवरील शेतीपिकांचं नुकसान झाल्याचं समोर आलंय. अवकाळीचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला. 911 हेक्टर क्षेत्रावरील कांद्याची पिकं बाधित झालेत. तर 191 हेक्टरावरील भाजीपाला पीक उद्ध्वस्त झालाय. गहू, मका, बाजरी या पिकांचंही नुकसान झालं. पंचनाम्याचा अहवाल आणि GPS छायाचित्रं जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेत. या नुकसानीतून 2 कोटी 19 लाख 46 हजार रुपयांची भरपाई मिळणं अपेक्षित आहे.
एकीकडे अवकाळी संकट आलेले असतानाचा आता उरल्या सुरल्या शेतमालाला पुरेसा बाजारभावही मिळत नाही. टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. टोमॅटोचं आगार अशी ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यात कवडीमोल बाजारभावामुळे टोमॅटो रस्त्यातच फेकून देण्याची वेळ आली आहे. कल्याण नगर महामार्गावर राजुरी बाजारात टोमॅटोला अत्यल्प भाव मिळाला. कल्याण नगर महामार्गावर राजुरी येथील बाजारात विक्रीसाठी आलेल्या टोमॅटोची विक्री न झाल्याने गाडीभाडेही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून दिलेय एकीकडे अवकाळी पाऊसाच्या संकटाने शेतकरी हतबल झाला आहे.
दरम्यान, विक्रमी उत्पादनामुळे बेदाण्याचे दर घसरले आहेत. राज्यातली शीतगृहसुद्धा बेदाणा साठवणीसाठी अपुरी पडत आहेत. तेव्हा बेदाणा खराब होण्याचीही भीती आहे. तसेच अवकाळी पावसामुळे द्राक्षही आंबट किंवा चवहीन झाल्यानं बेदाणाही चवहीन झाला. याचा परिणाम बेदाण्याचा दरावर झालाय. तेव्हा कांदा उत्पादकांसारखंच द्राक्ष उत्पादकांनाही एकरी एक लाख रुपये अनुदान देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. या मागणीसाठी 17 मे रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढणार आहेत.