धुळे: राज्याच्या अनेक भागांमध्ये मंगळवारी झालेल्या पावसाने शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. धुळ्याच्या शिरपूर परिसराला याचा सर्वाधिक फटका बसला. याठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. काही भागांमध्ये गारपीटही झाली. यामुळे फळबागा आणि गहू व हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. तसेच शिरपूरमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अवघ्या २० मिनिटांच्या पावसामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले. या पावसामुळे शिरपूरच्या अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.
अकोल्यातही जोरदार गारपीट
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वडाळी पिंपरी या परिसराला मंगळवारी संध्याकाळी गारपिटीसह पावसाने अक्षरश: झोडपून काढले. यामुळे मोठ्या प्रमाणात गहू , केळी व इतर फळबागांचे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे.
जालन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
जालन्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव, शहागड परिसरात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाल्याने परिसरातील नागरीकांची तारांबळ उडाली. अर्धा तास पाऊस झाल्याने परिसरात गारवा पसरला. पण यामुळे आंब्याला आलेला मोहोर गळून पडला.