दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : मिशेन बिगेन अंतर्गत राज्यात तब्बल ७५ दिवसांनी आजपासून खाजगी कार्यालये १० टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू होत आहेत. तर शासकीय कार्यालयातील उपस्थितीही आजपासून वाढणार आहे. दुसरीकडे विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळा शिक्षणासाठी बंदच राहणार आहेत. मात्र उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी आणि ऑनलाईन शिक्षणासाठी शाळा आजपासून सुरू होणार आहेत.
मुंबईत बेस्टसेवाही आजपासून सुरू होतेय. आजपासून वृत्तपत्रांचे वितरणही सुरू होणार आहे. ज्या खाजगी कार्यालयात १० किंवा त्यापेक्षा कमी कर्मचारी असतील त्या कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या परवानगी देण्यात आली आहे.
तर ज्या कार्यालयांमध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात तिथे १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीस परवानगी आहे. उरलेल्या कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य सरकारने खासगी ऑफिस सुरू करायला परवानगी दिली आहे. कामाच्या ठिकाणी सगळी जबाबदारी घेण्याच्या सूचनाही सरकारने केल्या आहेत. याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आठवड्यातला एक दिवस कामावर उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. एकही दिवस कामावर हजर न राहणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा संपूर्ण आठवड्याचा पगार कापला जाईल, असा इशारा सरकारने आधीच दिला आहे.
- विद्यार्थ्यांसाठी शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लासेस बंद राहणार
- आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार
- मेट्रो, लोकलसेवा बंद राहणार
- स्विमिंग पूल, जिम, सिनेमागृह, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार