कर गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीची अनोखी शक्कल, कर भरण्यासाठी लोकांची गर्दी

आयडियाची कल्पना आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीची

Updated: Feb 23, 2021, 11:01 PM IST
कर गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीची अनोखी शक्कल, कर भरण्यासाठी लोकांची गर्दी title=

प्रताप नाईक, कोल्हापूर : अनेक वेळा तगादा लावूनसुद्धा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे कर जमा होत नाहीत. त्यामुळे कर कसा गोळा करायचा असा प्रश्न असतो... त्यासाठीच कोल्हापुरातल्या सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीनं अनोखी  शक्कल लढवली आणि बघता बघता कर जमा व्हायला सुरुवात झाली. 

कर भरा आणि जिंका सोन्याची अंगठी 

ही आयडियाची कल्पना आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीची. थकलेला कर जे भरतील, त्यांच्यावर बक्षिसांची अशी लयलूट केली जाणार आहे. 15 हजार लोकसंख्येच्या सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीत तब्बल 58  लाख 12 हजार 729 थकबाकी आहे. म्हणूनच ही शक्कल शोधून काढली आहे.

या बक्षिसांचा खर्च सरपंच, उपसरपंच आणि इतर सदस्यांनी स्वतः  उचललाय. विशेष म्हणजे विरोधी सदस्यांनीही त्यामध्ये हातभार लावला आहे. सिद्धनेर्लीचे ग्रामस्थही या नव्या ऑफरवर खूष आहे. खरं तर ग्रामपंचायतीचा कर भरायलाच हवा. पण तरीही ब-याचवेळा थकीत रक्कम वाढत जाते. 

त्यातून ग्रामपंचायतीच्या खर्चाचा गाडा हाकणं कठीण होऊन जातं. म्हणूनच हा नवा लकी ड्रॉ. आता यामुळे तरी कर जमा होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच  थकीत असलेला हा कर वसूल करण्यासाठी  सिद्धीनेर्ली ग्रामपंचायतिच्या सदस्यांनी नाविन्यपूर्ण लकी ड्रॉ योजना राबवित एक वेगळा पायंडा घालून दिला आहे.