'पूल दुर्घटनेत घटनास्थळीही न येणारे उद्धव ठाकरे अमरावतीत प्रचाराला'

 उद्धव ठाकरे यांच्या असंवेदनशिलतेचे दर्शन राज्याला झाले आहे. 

Updated: Mar 15, 2019, 03:10 PM IST
'पूल दुर्घटनेत घटनास्थळीही न येणारे उद्धव ठाकरे अमरावतीत प्रचाराला'  title=

मुंबई : अमरावती येथे शिवसेना-भाजपा युतीने आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.  ही युती म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड... ती तुटणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भाजपाला यापुर्वी केलेला विरोध हा व्यक्तीगत विरोध होता असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या असंवेदनशिलतेचे दर्शन राज्याला झाले आहे. सीएसटीएम दुर्घटनेनंतर घटनास्थळीही न येणारे उद्धव ठाकरे अमरावतीत प्रचाराला गेल्याने त्यांच्यावर आणि युतीवरही टीका केली जात आहे. युतीच्या या असंवेदनशिलतेचा विरोधी पक्षांनी चांगलाच समाचार घेतला आहे. दुर्घटनाग्रस्त पुलाची जबाबदारी पालिकेची असल्याचे समोर आले आहे. तरी आयुक्त, महापौर यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणीही विरोधक करत आहेत. 

मुंबई पूल दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख तर जखमींना 50 हजार मदत- मुख्यमंत्री

युतीने अमरावतीतून प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. आपली युती ही कशी राष्ट्रीय विचारांसाठी बनली आहे हे कार्यकर्त्यांना पटवून दिले. पण नुकत्याच झालेल्या मुंबईतील सीएसएमटी दुर्घटनेचा साधा उल्लेखही कोणी केला नाही. मुख्यमंत्र्यांनी काल आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले. उद्धव ठाकरे यांनी तिथे येण्याचीही तसदी घेतली नाही असा आरोप विरोधकांमार्फत केला जात आहे. 

Image result for uddhav and cm zee news

मुंबईच्या लोकांना कोणी वाली राहीला नाही. या पुलाची मुदत संपली होती. शिवसेना-भाजपाच्या भांडणात कार्यक्षम अधिकारी त्यांना नेमता येत नाही. म्हणून अशा दुर्घटना घडतात असा आरोप काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे. मुंबईत अतिशय वाईट परिस्थिती आहे. केवळ पैसे देऊन अशी प्रकरणे मिटणार नाहीत असेही ते म्हणाले. 

शिवसेनेचा हा निर्ढावलेपणा दिसतोय. पालिका ही भ्रष्टाचाराचे केंद्र आहे. अनेक आगीच्या घटना होत आहेत, पूल कोसळत आहेत पण कोणावरही कारवाई होत नाही असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे.  ज्यांच्यामध्ये क्षमता नाही अशा आयुक्त आणि महापौरांनी राजीनामा द्यायला हवा असेही त्यांनी म्हटले आहे. 

सीएसएमटी पूल दुर्घटना : मृतांच्या नातेवाईंकांच्या प्रश्नांची उत्तरे ना रेल्वे ना पालिकेकडे

उद्धव ठाकरे असतील किंवा मुख्यमंत्री असतील हे किती असंवेदनशील आहेत हे सर्वांनी पाहिले आहे. मुख्यमंत्री इतक्या उशीरा जातात. उद्धव ठाकरे तर गेले नाहीतच तर सेनेचे कोणतेही महत्त्वाचे नेते तिथे गेले नाहीत. जनतेचे हाकनाक बळी जात आहेत आणि दुसरीकडे आपण 48 जागा निवडुन आणू ही कमालीची असंवेदनशिलता असल्याची प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.