उद्धव ठाकरे दुष्काळी दौऱ्यावर, शेतकरी मेळाव्याचे आयोजन

 उद्धव ठाकरे आज नांदगाव दौऱ्यावर असून, दुष्काळ पाहणी तसेच शेतकरी पीककर्ज व पिकविम्यासंदर्भात  शेतकऱ्यांशी  संवाद  साधणार  आहे.  

Updated: Jun 22, 2019, 10:02 AM IST
 उद्धव ठाकरे दुष्काळी दौऱ्यावर, शेतकरी मेळाव्याचे आयोजन title=
संग्रहित छाया

नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नांदगाव दौऱ्यावर असून, दुष्काळ पाहणी तसेच शेतकरी पीककर्ज व पिकविम्यासंदर्भात  शेतकऱ्यांशी  संवाद  साधणार  आहे. यानिमित्ताने  शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली असून ठाकरे यांच्या स्वागताचे  फलक  तालुक्यात  लावण्यात  आले आहे. दरम्यान, विधानसभा निवडुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे. या नायगाव या विधानसभा मतदार संघावर भाजपकडून दावा करण्यात येत आहे. त्यामुळे मेळाव्याच्या  माध्यमातून शक्तिप्रदर्शन करून भाजपला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या दौऱ्याच्या निमित्ताने करण्याची शिवसेनेची चाल असल्याचे म्हटले जात आहे.

या दौऱ्यानिमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनीही  नांदगावला हजेरी लावत मेळाव्याच्या तयारीची पाहणी केली आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते  छगन  भुजबळ याच्यावर उद्धव भाष्य करणार का, याचीही उत्सुकता आहे. पंकज  भुजबळ आमदार असलेल्या  नांदगाव तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख दौरा करित असल्याने  दौऱ्याला  विशेष  महत्व  प्राप्त झाले आहे. दुपारी  १ वाजता  होणाऱ्या मेळाव्यासाठी  शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी शिवसैनिक कामाला लागले आहे.

उद्धव  ठाकरे शेतकरी मेळाव्यासाठी येत असले तरी युतीच्या जागावाटपाकडे शिवसेनेकडे असलेल्या  नांदगाव विधानसभा मतदार  संघावर भाजकडून दावा सांगितला जात असल्याने मेळाव्याच्या  माध्यमातून शक्तिप्रदर्शन करून भाजपला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न  दौऱ्याच्या निमित्ताने केला गेला आहे, अशी चर्चा आहे.