उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ? तर अजित पवार उपमुख्यमंत्री ?...जाणून घ्या

 शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रीपद तसेच गृहमंत्रीपद जाण्याची शक्यता

Updated: Nov 11, 2019, 07:41 AM IST
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ? तर अजित पवार उपमुख्यमंत्री ?...जाणून घ्या title=

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर आमचाच मुख्यमंत्री होणार म्हणणाऱ्या भाजपाने माघार घेतली. त्यानंतर आता शिवसेनेला ही संधी मिळाली आहे. शिवसेना राष्ट्रवादी सोबत जाऊन काँग्रेसचा बाहेरुन पाठींबा घेऊ शकते अशी माहिती समोर येत आहे. असे झाल्यास शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रीपद तसेच गृहमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी असतील असे ठरल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. तर जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी असू शकते. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद दिले जाऊ शकते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत या फॉर्मुलावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल याचा पुनरोच्चार शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. असे झाल्यास ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्री पदी विराजमान होऊ शकते. आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवून त्यांनी निवडणूक न लढण्याची ठाकरे घराण्याची परंपरा मोडली. आमच्या घराण्यातील कोणीही सरकारमध्ये सहभागी होणार नाही असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे म्हणणे होते.