'फडणवीसांनी मोदी-शहांना पत्र लिहावं, पटेलांना भेटणे देशहिताचे नसून भाजपच्या...'; ठाकरे गटाचा सल्ला

Uddhav Thackeray Group Slams Fadnavis: "मलिक, पटेलांच्या देशद्रोहाइतकेच संजय राठोडांचे कर्तृत्व आहे, पण भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकताच त्या अबलेच्या किंकाळ्या भाजपच्या नीतीबाज कोल्ह्यांना ऐकू येणे बंद झाले."

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 9, 2023, 09:14 AM IST
'फडणवीसांनी मोदी-शहांना पत्र लिहावं, पटेलांना भेटणे देशहिताचे नसून भाजपच्या...'; ठाकरे गटाचा सल्ला title=
फडणवीस आणि भाजपावर हल्लाबोल

Uddhav Thackeray Group Slams Fadnavis: राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवार गटातील आमदारांबरोबर सत्ताधारी बाकावर बसल्याच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. हे पत्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरुन शेअर केल्याने यावरुन अजित पवार गटात नाराजी असल्याचं समजतं. अशातच आता ठाकरे गटाने नवाब मलिक यांना जो न्याय लावण्यात आला तो प्रफुल्ल पटेल यांना का लावण्यात आला नाही असा सवाल विचारला आहे. तसेच फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही एक पत्र लिहावं अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.

भाजपने त्यांच्या वॉशिंग मशीनचे बटण बंद करून...

"पैशांचे सोंग आणता येत नाही, पण नैतिकतेचे ढोंग मात्र हमखास आणता येते. अशा ढोंगाचे प्रात्यक्षिक नवाब मलिक यांच्या निमित्ताने भाजपने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. नवाब मलिक हे वैद्यकीय जामिनावर तुरुंगातून सुटले. मलिक यांना कोर्टाने राजकीय भाष्य करण्यास बंदी घातली आहे. मलिकांनी आता अजित पवार गटाचा आश्रय घेतला. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मलिक सत्ताधारी बाकांवर म्हणजेच अजित पवार गोटात जाऊन बसताच विरोधकांनी भाजपचे वस्त्रहरण सुरू केले. मलिक यांच्या बाबतीत आधी काय बोलत होतात व आता ते तुमच्या गोटात शिरल्यावर तुमची नैतिकता कशी पचपचीत झाली आहे? असे सवाल उठताच भाजपने त्यांच्या वॉशिंग मशीनचे बटण बंद करून स्वतःला विचारमंथनात बुडवले," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

बाजूलाच बसलेल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र

"फडणवीस यांनी अजित पवारांना विधान भवनाच्या आवारातच पत्र लिहून नैतिकतेची उबळ बाहेर काढली. फडणवीस आपल्या पत्रात लिहितात, ‘‘काय हे दादा? तुम्ही तर आमच्या इज्जतीचा सारा चोथाच केला राव! नवाब मलिक यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही. सत्ता येते सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. मलिक यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली. मलिक यांना कोर्टाने निर्दोष सोडले नसून त्यांना फक्त वैद्यकीय कारणामुळे जामीन मिळाला आहे. मलिकांसारखे लोक सत्ताधारी बाकांवर आले तर महायुतीस बाधा पोहोचेल,’’ अशा प्रकारच्या मंबाजी छाप कीर्तनाचा सूर त्यांनी लावला. मलिक यांच्या निमित्ताने विरोधकांनी भाजपची ‘हुर्यो’ उडवल्यावर फडणवीसांनी लेखणी उपसली व अजित पवार यांना पत्र लिहिले. मोदींनी ‘डिजिटल इंडिया’ केले, मोदींनी ‘5-जी’ वगैरे आणले. त्यामुळे फडणवीसांना त्या साधनांचा वापर करून अजित पवारांना जागीच दटावता आले असते, किंबहुना नैतिकतेच्या मुद्द्यावर सभागृहातच मलिक यांना रोखता आले असते, पण फडणवीसांनी त्यांच्या बाजूलाच बसलेल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले," असा टोला लेखातून लगावण्यात आला आहे.

नक्की वाचा >> मलिकांवरुन फडणवीस-पवारांमध्ये जुंपली असतानाच CM शिंदे म्हणाले, 'पक्ष कसा चालवावा हा..'

मलिक यांना जो ‘न्याय’ तो पटेलांना का नाही?

"नैतिकतेच्या प्रश्नी आमचे ढोंग किती पक्के व छक्केबाज आहे हे त्यांनी (फडणवीस यांनी) पत्रातून दाखवले, पण विनोद असा की, याच अजित पवार गटाचे दिल्लीतील सूत्रधार प्रफुल पटेल यांचे कारनामे तर मलिकांच्या वरचे आहेत. मलिक यांनी दाऊदसंबंधित लोकांशी जमिनीचा व्यवहार केला. त्यामुळे ‘ईडी’ने त्यांना अटक केली, तर पटेल यांनीही बॉम्बस्फोटांतील म्होरक्या व दाऊदचा जिगरी मिर्चीभाई याच्याशी जमीनजुमला, आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाल्याने स्वतः पंतप्रधान मोदी यांनीच पटेलांवर लाखोली वाहिली होती. पटेल यांची दाऊद-मिर्ची व्यवहारातील सर्व संपत्ती ‘ईडी’ने जप्त केली, पण मलिक यांना अटक केलेल्या ‘ईडी’ने त्यापेक्षा भयंकर प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप असूनही पटेल यांना मात्र अटक केली नाही. आरोप तेच, व्यवहार तोच, पण दोन वेगळे ‘न्याय’ लावले. मलिक यांना जो ‘न्याय’ तो पटेलांना का नाही? असा प्रश्न भाजप विरोधकांनी आता विचारला आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'कांड्या पेटवायच्या, त्यातून...'; पत्रावर CM शिंदेंची सही असल्याचं ऐकताच खवळले अजित पवार

पटेल ‘मिर्ची’ हार घेऊन सगळ्यात पुढे

"पटेल हे दोन दिवसांपूर्वीच गृहमंत्री अमित शहा यांना हसत हसत भेटले व देशाच्या गृहमंत्र्यांनीही ‘मिर्ची’फेम पटेलांचे हसत हसत स्वागत केले. राष्ट्रवादी काँगेस फोडून भाजप गोटात शिरण्याच्या प्लॅनबाबत मिर्चीभाई पटेलच अमित शहांशी चर्चा करीत होते. पटेल हे ‘यूपीए’ सरकारमध्ये मंत्री असताना त्यांच्या मिर्ची व्यवहाराबद्दल भाजपने सोनिया गांधी यांना प्रश्न विचारले होते. तेच पटेल आज भाजपबरोबर फिरत आहेत. 15 दिवसांपूर्वी मोदी हे गोंदियाच्या विमानतळावर उतरले तेव्हा पटेल ‘मिर्ची’ हार घेऊन सगळ्यात पुढे होते. आता त्या ‘मिर्ची’ची खीर झाली की मधुर हलवा झाला? याचा खुलासा फडणवीस यांनीच करायला हवा, की त्यांची नैतिकता मिर्चीच्या ठेच्यात विरघळून गेली?" असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

नक्की वाचा >> 'ए बाबा, इतरांनी काय..'; फडणवीसांच्या स्फोटक पत्राबद्दल विचारल्यावर संतापले अजित पवार

संजय राठोड यांना मंत्रीमंडळात घेऊन नैतिकतेचे मुंडकेच उडवले

"महाराष्ट्रातील संतांचे राज्य जाऊन असे ढोंगी मंबाजी व तुंबाजीचे अवतार सध्या येथे निपजले आहेत. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे ऑडिट होत असते, तसे एक ऑडिट भाजपच्या नैतिकतेचे व्हायला हवे. पटेल यांना भाजपने देशासाठी नव्हे, तर सत्तेसाठीच स्वतःच्या पाळण्यात घातले आहे. महाराष्ट्रातील हसन मुश्रीफ, भावना गवळी, प्रताप सरनाईक, छगन भुजबळ, दस्तुरखुद्द सिंचन घोटाळाफेम अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराबाबत भाजपने तेव्हा जे नैतिकता व संस्कृतीचे फटाके फोडले होते, त्याचे आता काय झाले? संजय राठोड या मंत्र्याचा एका महिला आत्महत्येप्रकरणी भाजपने राजीनामा मागितला होता. नैतिकतेच्या मुद्दयावर तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्या मंत्र्यास घरी पाठवले. त्याच मंत्र्यास फडणवीस यांनी पुन्हा मंत्री करून नैतिकतेचे मुंडकेच उडवले. मलिक, पटेलांच्या देशद्रोहाइतकेच राठोडांचे कर्तृत्व आहे, पण भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकताच त्या अबलेच्या किंकाळ्या भाजपच्या नीतीबाज कोल्ह्यांना ऐकू येणे बंद झाले. मंत्रिमंडळातील बहुसंख्य मंत्री डुकरांप्रमाणे भ्रष्टाचाराच्या चिखलात लोळत आहेत. आरोग्यमंत्र्यांनी तर संपूर्ण यंत्रणाच लिलावात काढली, पण फडणवीस यांनी पत्र लिहिले ते फक्त नवाब मलिक यांच्याविषयी," असा टोला ठाकरे गटाने लागवला आहे.

नक्की वाचा >> पत्रास कारण नवाब मलिक... फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं

मोदी, शाहांनाही पत्र लिहा

"मिर्चीफेम प्रफुल पटेल पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांना भेटतात. देवेंद्र फडणवीस यांनी मोदी-शहांना एक पत्र लिहून ‘‘पटेलांना भेटणे देशहिताचे नाही. भाजपच्या नैतिकतेत ते बसत नाही. साहेब, पटेलांना लांब ठेवा’’ असे सांगण्याचे धाडस दाखवावे. तरच मलिकांच्या बाबतीतील त्यांच्या नैतिकतेच्या उचक्या खऱ्या, नाहीतर पैशाचे सोंग व भाजपचे नैतिकतेचे ढोंग सारखेच. त्यांच्या नैतिकतेचे ऑडिट करावेच लागेल," असं लेखाच्या शेवटी फडणवीस यांना सल्ला देताना ठाकरे गटाने म्हटलं आहे.