कोल्हापूर : Jayaprabha studio land Sale : जयप्रभा स्टुडिओची जागा दोन वर्षापूर्वी विक्री झाल्याचे उघड झाले आहे. जयप्रभा स्टुडिओची ही जागा दिव्ंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकीची होती. हा स्टुडिओ मूळ स्वरूपात राहावा यासाठी कोल्हापूरकरांनी मोठा लढा उभा केला होता. स्टुडिओच्या जागेचे तुकडे पडत अनेकांना ही जागा विकल्याचे समोर आले आहे. 15 फेब्रुवारी 2020 ला 6 कोटी 50 लाख रुपये किमतीला विक्री झाल्याच समोर आले आहे.
दरम्यान, कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज वास्तूच राहणार असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, हेरिटेज वास्तूची जागा विकल्याने अनेकांना धक्का बसला आहे. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांची कर्मभूमी आणि अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांचे निर्मितीस्थान असलेला कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओचा हेरिटेज दर्जा मुंबई उच्च न्यायालयाने कायम राखला. जयप्रभा स्टुडिओची जागा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकीची आहे.
राज्य सरकारने 29 फेब्रुवारी 2012 रोजी अधिसूचना काढून जयप्रभा स्टुडिओचा समावेश हेरिटेज-33 दर्जाच्या वास्तूत केले. त्यानंतर लता मंगेशकर यांनी या विरुद्ध रिट याचिका केली होती. मात्र, लतादीदींची याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज वास्तू राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या वास्तूची काही जागा विकल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ हेरिटेजमध्येच आहे, असा न्यायालयाचा निकाल असताना जागेची विक्री कशी काय झाली?, याचे काय गौडबंगाल आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.
जयप्रभा स्टुडिओचा वारसा आणि चित्रपटसृष्टीला असलेले योगदान लक्षात घेऊन स्टुडिओची जागा चित्रपट निर्मितीसाठीच आरक्षित ठेवली जाईल, असे आश्वासन तत्कालीन महापौर कादंबरी कवाळे यांनी दिले होते. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी, चित्रपट कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्या शिष्टमंडळाने महापौर कवाळे यांची भेट घेऊन याप्रश्नी चर्चा केली होती. मात्र, स्टुडिओच्या वास्तूची जागा विकली गेल्याने जयप्रभा स्टुडिओचा वारसा आणि चित्रपटसृष्टीचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.