पुणे : किडनी रॅकेट ( Kidney Racket ) प्रकरणात नव्याने तीन रुग्णालयांची नावे समोर आली आहेत. पुण्यातील वानवडी ( Vanvadi ) येथील इमानदार ( Inamdar ), ठाण्यातील ज्युपिटर ( Jyupiter ) आणि कोईम्बंतूर येथील के.एम.सी.एच ( K.M.C.H. )अशी तीन रुग्णालयांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रुबी हॉल ( Ruby Hall ) क्लिनिकमध्ये ज्या प्रकारे बनावट कागदपत्राद्वारे एजंटमार्फत किडणी प्रत्यारोपण करण्यात आले त्याचप्रकारे या तीनही रुग्णालयात किडणी प्रत्यारोपण झाल्याचे तपासात आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. किडनी तस्करीचे हे प्रकरण उजेडात आल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढत आहे.
किडनी रॅकेट प्रकरणाचा तपास आता कोरेगाव पोलिसांकडून (Koregaon Police ) गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने अभिजित शशिकांत गटणे (वय 40, रा. रजूत वीटभट्टी, एरंडवणे गावठाण) आणि रवींद्र महादेव रोडगे (वय 43, रा. लांडेवाडी, पिंपरी-चिंचवड) या दोघा एजंटांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली आहे.
गटणे, रोडगे आणि त्यांच्या एका साथीदाराने मिळून इनामदार, के.एम.सी.एच व ज्युपिटर या तीन रुग्णालयात बनावट नातेवाईक, कागदपत्रे दाखवून किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया केल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे रुबी हॉलमध्ये समोर आलेल्या किडनी रॅकटचे धागेदोरे थेट परराज्यातील कोईम्बंतूरपर्यंत पोहोचले आहेत तसेच राज्यातील इतर रुग्णालयातदेखील किडनी प्रत्यारोपण करण्यात आल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती अतिरिक्त सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.