मी यापुढे इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई

मी यापुढे ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांना महाराज म्हणणार नाही. मी त्यांना या आधीही इंदुरीकर महाराज असंच म्हणत होते.

Updated: Feb 20, 2020, 10:11 PM IST
 मी यापुढे इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई title=

अहमदनगर : मी यापुढे ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांना महाराज म्हणणार नाही. मी त्यांना या आधीही इंदुरीकर महाराज असंच म्हणत होते. पण ज्या पद्धतीने त्यांनी नोटीशीला उत्तर दिलं आहे, ते मला त्यांच्याकडून अपेक्षित नाही. मी असं बोललोच नाही, आणि या ठिकाणावर कीर्तन झालंच नाही, ही जनतेची दिशाभूल आहे, असं भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

इंदुरीकर यांच्याविरोधात तक्रार देण्यावर मी अजूनही ठाम आहे, खोटं बोलण्याचा गुन्हा देखील त्यात आता टाकावा लागेल. मी तक्रार न करण्याचा प्रश्नच नाही, कारण ज्या पद्धतीने इंदुरीकरांचा समर्थकांनी मला सोशल मीडियावर अश्लील शब्द वापरले आहेत, अपमान केला आहे, तो विसरण्यासारखा नसल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे बीडमध्ये काही महिला पदाधिकाऱ्यांनी बीडमध्ये पाय ठेवूनच दाखवा असं आवाहन तृप्ती देसाई यांना दिलं आहे. ही स्टंट बाजी आहे. महाराजांचं तोंड काळं करण्याची भाषा करणाऱ्यांनी बीडमध्ये पाय ठेवूनच दाखवावा, असं काही महिला शिवसैनिकांनी म्हटलं आहे.

यावर बोलताना, तृप्ती देसाई म्हणाल्या, माझं महिला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे, नीलमताई गोऱ्हे यांच्याशी याविषयी चर्चा झाली आहे, त्यांची कोणतीही विरोधाची भूमिका नसल्याचं त्यांनी मला स्पष्ट केलं आहे, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.