पुणे : पहिल्याच भाषणामुळे ट्रोल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार अखेर प्रसार माध्यमांपुढे बोलले आणि आपली बाजू सावरण्याचा प्रयत्नही केला. पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ १७ मार्चला मोठ्या धुमधडाक्यात झाला. पण पार्थ पवार यांच्या प्रचारापेक्षा इंग्रजाळलेल्या मराठीत त्यांनी केलेल्या भाषणाचीच चर्चा अधिक झाली आणि ते ट्रोलही झाले. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी अखेर मौन सोडून खुलासा करताना, पहिलच भाषण असल्याने एक दोन चुका झाल्याचे सांगितले. सोबतच आपण कमी बोलतो पण काम जास्त करतो असं सांगत, टीकाकारांना उत्तर देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.
पार्थ पवार पहिल्याच भाषणामुळे झाले ट्रोल
प्रसार माध्यम प्रतिनिधींसमोर आपली बाजू मांडताना पार्थ बोलले तेही मोजकंच. निवडणुकीला कशाच्या आधारावर पुढे जाणार यासाठी लवकरच पत्रकार परिषद घेऊ असे सांगत त्यांनी इतर प्रश्नांची उत्तरे देणे टाळले. एकंदरीत पवार घराण्याचा राजकीय वारसा पुढे नेताना, पार्थ पवार यांना आपले कर्तृत्व आणि वक्तृत्वही सिद्ध करावे लागणार आहे हे निश्चित. यावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.