पूजा खेडकरांना पुणे पोलिसांची नोटिस, 'त्या' प्रकरणात आज जबाब नोंदवणार

IAS Pooja Khedkar News: आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी नोटिस बजावली आहे. आज त्यांचा जबाब घेण्यात येणार आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 18, 2024, 08:06 AM IST
पूजा खेडकरांना पुणे पोलिसांची नोटिस, 'त्या' प्रकरणात आज जबाब नोंदवणार title=
trainee ias officer puja khedkar asked to appear before pune cops

IAS Pooja Khedkar News: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आज पुणे पोलिस त्यांचा कबुलीजबाब नोंदवणार आहेत. पूजा खेडकर यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आरोप केले होते. त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी खेडकरांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवले आहेत. 

ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. खासगी कारवर लाल दिव्यामुळं तर महाराष्ट्र शासनाच्या पाटीमुळं चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक खोटे प्रमाणपत्र जोडल्याचा दावादेखील करण्यात आला होता. पूजा खेडकर यांचा पाय खोलात असतानाच त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यासंदर्भातही दोन व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळं संपूर्ण खेडकर कुटुंबीय चर्चेत आले होते. 

पूजा खेडकर यांच्यावर आरोप होत असतानाच त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळवणुकीचे आरोप केले होते. पूजा खेडकर यांनी वाशिम पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ती तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. यानंतर पुणे पोलिसांनी पुजा खेडकर यांचा नव्याने जबाब नोंदवायच ठरवलं आहे. त्यासाठी पूजा खेडकर यांना पोलिसांनी आज जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. 

पुणे पोलिस दलातील महिला अधिकारी पुजा खेडकर यांचा जबाब नोंदवणार आहेत. त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीबाबत काय करायचं याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

पूजा खेडकरांच्या वडिलांचीही चौकशी

पूजा खेडकर यांच्या वडीलांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिक एसीबी कडून 5 वर्षांपासून दिलीप खेडकरांची सुरू आहे. त्यानंतर आता या चौकशीला वेग आला आहे. पूजा खेडकर यांच्या वडिलांनी अपसंपदा गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

पूजा खेडकरांचे प्रशिक्षण स्थगित

पूजा खेडकर यांचा महाराष्ट्रातील जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केलीय. 23 जुलै पूर्वी मसूरी इथल्या अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे पूजा खेडकर यांना आदेश देण्यात आले आहे.