प्रफुल्ल पवार, रायगड : सुट्टी, जवळच्या पर्यटनस्थळी घालवायची तर मग कोकणाशिवाय दुसरा पर्याय असुच शकत नाही. असं सध्याचं पुण्या मुंबईतल्या लोकांसाठी समिकरण झालंय.
पण, सध्याच्या घडीला गुजरात राजस्थान आणि मध्यप्रदेशातूनही कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक येताना दिसतायत.
मुंबईच्या जवळचं फेव्हरेट डेस्टिनेशन म्हणजे कोकणातले स्वच्छ समुद्र किनारे, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक या समुद्र किनाऱ्यांकडे वळले आहेत. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानचे पर्यटकही आता कोकणात यायला लागले आहेत.
आठवडाभरात अलिबाग, काशिद, मुरूड, दिवेआगार आणि हरिहरेश्वरच्या किना-यांवर ३५ हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिलीय.
समुद्रात डुंबकी लगावणं आणि वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेताना पर्यटक दिसतायत. घोडा, उंटाच्या सवारीनं बच्चेकंपनी खुश होते तर पॅरासेलिंग एटीव्ह राईड्स, जायंटबॉलसारख्या साहसी खेळांमुळे बडी मंडळीही खुश होतायत.
खेळून दमल्यावर ताज्या मासळीचा फडशा पाडला जातो आणि पर्यटकांच्या येण्यानं व्यावसायिकही खूश होतात.
तुम्हालाही समुद्रकिनाऱ्यांवर सुटी घालवायची असेल आणि ताज्या मासळीवर आडवा हात मारायचा असेल तर मग त्यासाठी कोकणाइतकं चांगलं ठिकाण असूच शकत नाही. तेव्हा "येवा कोकण आपलोच आसा...".