Samruddhi Mahamarg : तुम्ही समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणार असल्यास ही बातमी तुमच्यासाठी. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता समृद्धी महामार्गावर आता गाड्यांचे टायर घासले असल्यास प्रवेश मिळणार नाही. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सोमवारपासून तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
समृद्धी महामार्गावर आता गाडी चालवण्यासाठी स्पीड लिमिट निश्चित, अन्यथा कारवाई
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार एन्ट्री पॉइंटवर दिवसभरात 208 गाड्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील 22 गाड्यांचे टायर घासलेले आणि जीर्ण झालेले आढळल्याने या गाड्यांना माघारी पाठविण्यात आले. जास्त करुन अपघात हे टायर फुटल्याने झाल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळे ज्या गाड्यांचे टायर चांगले नसतील, त्या गाड्यांना या महामार्गावरुन पुढे सोडायचे नाही, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
नागपूर ते शिर्डीदरम्यान समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. या महामार्गावरुन प्रवास सुरु झाल्यापासून पहिल्या 100 दिवसांत जवळपास 900 पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सुसाट वेगामुळे गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन, तसेच टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आरटीओंच्या पाहणीत दिसून आले आहे. त्यामुळे समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शिर्डी ते नागपूरपर्यंत हा महामार्ग खुला झाला आहे. मात्र, हा महामार्ग खुला झाल्यानंतर गाड्या सुस्साट वेगाने धावत आहेत. त्यामुळे अपघात आणि टायर फुटण्याच्या घटनांमुळे चिंतेत भर पडली. त्यामुळे मृद्धी हायवेवर स्पीड लिमिट निश्चित करण्यात आले आहे. आता यापुढे स्पीड लिमिट मोडले तर तुमच्यावर कारवाई होणार आहे. समृद्धी महामार्ग हा गाड्या दीडशे किलोमीटर प्रति तास वेगाने धावतील हे लक्षात ठेऊन बांधण्यात आला होता. पण महामार्ग सुरु झाल्यापासून अपघात आणि टायर फुटण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे ही वेगमर्यादा आता ताशी 120 किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे. या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर केवळ 5 तासांच पार करता येत आहे. 11 डिसेंबर 2022 पासून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. या मार्गाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच समृद्धी महामार्गावर दुचाकी तसेच तीन चाकी रिक्षा यांना परवानगी नाही. यामुळे पादचाऱ्यांना देखील येथे जाण्यास, मनाई आहे. त्यातच समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा इंटरचेंज जवळ काही तरुणांनी स्टंटबाजी केल्याचा पुढे आले होते. त्यामुळे आता अपघात रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहेत.