थर्टी फर्स्ट, नववर्ष स्वागत : रायगडात जिल्हा प्रशासनाचे कडक निर्बंध, व्यावसायिक हवालदील

थर्टी फर्स्ट (Thirty First) आणि नववर्ष स्वागतासाठी (New Year Welcome) यंदा रायगड (Raigad) जिल्ह्याच्या किनारयांवर हॉटेल आणि लॉजेसचे बुकिंग दरवर्षीच्या तुलनेत खूपच कमी झाले आहे. 

Updated: Dec 30, 2020, 11:37 AM IST
थर्टी फर्स्ट, नववर्ष स्वागत : रायगडात जिल्हा प्रशासनाचे कडक निर्बंध, व्यावसायिक  हवालदील title=

प्रफुल्ल पवार / अलिबाग : थर्टी फर्स्ट (Thirty First) आणि नववर्ष स्वागतासाठी (New Year Welcome) यंदा रायगड (Raigad) जिल्ह्याच्या किनारयांवर हॉटेल आणि लॉजेसचे बुकिंग दरवर्षीच्या तुलनेत खूपच कमी झाले आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर यंदा नवीन वर्षाचे स्वागत घरातच राहून साधेपणाने करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शिवाय यंदा थर्टीफर्स्ट साजरा करण्यावर राज्य सरकार आणि रायगड जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. पोलिसांनीही कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

रात्रीच्या संचारबंदी बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम आणि पार्ट्याच्या आयोजनावर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्याचा मोठा परिणाम इथल्या व्यवसायावर झाला आहे. यंदा थर्टीफर्स्टसाठीचे बुकिंग तर सोडाच इनक्वायरी देखील होत नसल्याचे व्यावसायिक सांगतात. महिनाभरापूर्वी झालेल्या बुकिंगदेखील कॅन्सल झाल्या आहेत . दरवर्षी हजारो पर्यटक रायगडच्या किनाऱ्यांवर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी येत असतात. मुंबई पुण्यापासून जवळ असलेल्या रायगडला अधीक पसंती असते.

अलिबागसह दिवेआगर, मुरुड, काशीद, नागाव, किहीम, श्रीवर्धन इथले किनारे हाऊस फुल्ल होतात. २५ ते २७ डिसेंबर दरम्यान सलग सुट्या आल्याने मोठया संख्येने पर्यटक कोकणात आले होते. मात्र यंदा बुकिंग नसल्याने व्यावसायिक हिरमुसले आहेत. अपेक्षेच्या तुलनेत केवळ २० ते २५ टक्के इतकंच बुकिंग झालं आहे. बुकिंग कमी झाल्याने पर्यटनावर आधारित इतर व्यवसायांवर देखील या काळात परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे थर्टीफर्स्टसाठी पर्यटक यायला तयार नाहीत. दरवर्षी प्रमाणे यंदा अजिबात बुकिंग नाही, विचारण्यासाठी फोनदेखील येत नाहीत. त्यामुळे दर कमी करण्याची वेळ आली असल्याचे हॉटेल व्यावसायिक गिरीश मोटा यांनी सांगितले.