उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अनेकांनी गाठले पोलीस ठाणे, असं त्यांनी का केले?

 उदयनराजे भोसले  रॅलीमध्ये  चोरट्यांनी हातसफाई केली. या रॅलीत तब्बल एक दोन नव्हे तर ३३ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले.  

Updated: Apr 4, 2019, 05:56 PM IST
उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अनेकांनी गाठले पोलीस ठाणे, असं त्यांनी का केले? title=

सातारा : लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करत असताना मोठ्या प्रमाणात उदयनराजे समर्थकांची उपस्थिती होती. सातारच्या राजवाडा परिसरातून राष्ट्रवादीच्या रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत प्रचंड गर्दी झाली होती. रॅलीमध्ये पांढरे कपडे परिधान करुन गळ्यात सोन्याच्या चेन हातात अंगठी, अशा पोशाखात रॅलीत मिरवणाऱ्या उदयनराजेंच्या समर्थकांना मोठा फटका बसला आहे. काही चोरट्यांच्या टोळीने या रॅलीत शिरून चांगलीच हातसफाई केली. या रॅलीतील लोकांच्या खिशावर तसेच सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल एक दोन नव्हे तर ३३ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. तसेच गर्दीचा फायदा उठवून बऱ्याच लोकांच्या खिशातील रोख रक्कम पण लंपास झाली आहे. त्यापैकी १३ जणांनी रीतसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीच्या या रॅलीत चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत, अशी माहिती शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात उदयनराजेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत साताऱ्यात माझी दहशत आहे, याची कबुली दिली. आपल्या दशहतीमुळे साताऱ्यात गुन्हेगारी कमी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे त्यांनी एमपीचा अर्थ पार्लमेंट मेम्बर नसून मिलिटरी पोलीस आहे. असे देखील सांगितले होते. पण आता त्याच महाराजांच्या रॅलीत एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने राज्यांच्या कार्यकर्त्यांना शेवटी सातारा पोलिसांकडे धाव घ्यावी लागली आहे.