बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी बंद; असं अचानक झालं तरी काय?

बारामती विरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाण्यावरुन वाद पेटला आहे. 

Updated: Apr 20, 2024, 08:47 PM IST
बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी बंद; असं अचानक झालं तरी काय?   title=

Baramati Water Supply :  बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी आता बंद झाले आहे. आधी भाटघर धरणाचे पाणी बंद केले तर आज निरदेवघर धरणाचे पाणी बंद केले. बारामतीला पाणी पुरवणाऱ्या निरदेवघर धरणाचे ही पाणी बंद करण्यात आले. यामुळे बारामती विरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे. 

भोर तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पाणी बंद करण्यासाठी आक्रमक पवित्र घेतला होता. धरणावर अवलंबून असलेल्या हिरड्यास मावळ गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.  गावकरी पाणी बंद करण्यासाठी निरा देवघर धरणावर ठिय्या मांडून बसले होते आजच्या आज पाणी बंद नाही केले तर पाण्यात उड्या मारण्याचा पवित्रा घेतला होता. 

पुण्यातील भाटघर धरणात केवळ 11%पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा विसर्ग थांबवल्यामुळे भोर तालुक्यावर पाणीसंकट ओढवलंय. पाणी प्रश्न न सोडवल्यास 42 गावांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. तसंच भाटकर धरण प्रकल्पग्रस्तांनीही जलसमाधीचा इशारा दिलाय.

पाणीप्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं चक्क जलसंपदामंत्री म्हणून जयंत पाटलांचं नाव घेतलं आणि...

पुणे जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं चक्क जलसंपदामंत्री म्हणून जयंत पाटलांचं नाव घेतलं... पुण्यात प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.... यावेळी ते पाणीप्रश्नावर बोलत होते. यावेळी त्यांनी जलसंपदामंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता चक्क जयंत पाटलांचा उल्लेख केलाय... मात्र चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ती दुरुस्त केली. 

नाशिक जिल्ह्यावर पाणीसंकट 

नाशिक जिल्ह्यावर पाणीसंकट ओढावलंय... नाशिकच्या प्रमुख धरणांमध्ये केवळ 24 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहीलाय.. एप्रिल महिन्यातच इथल्या लघुप्रकल्पांनी तळ गाठलाय.. पुणेगाव, तिसगाव, नागासाक्या धरणांतील जलसाठा शून्यावर पोहोचलाय.. नांदगाव आणि मनमाडला पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसलीये.