चिपळूणमध्ये जुळ्यांचं एक आगळंवेगळं संमेलन

जुळ्या मुलांना वाढवणं हे पालकांसाठी देखील मोठं आव्हान असतं.  

Updated: Feb 4, 2020, 09:05 AM IST
चिपळूणमध्ये जुळ्यांचं एक आगळंवेगळं संमेलन title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : चिपळूणमध्ये जुळ्यांचं एक आगळंवेगळं संमेलन भरलं होतं. तब्बल २५ जुळ्या जोड्यांनी या संमेलनात सहभाग नोंदवला. सेम टू सेम दिसणाऱ्या माणसांच्या आयुष्यात कशा गंमतीजंमती होतात. अनेकदा समोरच्यांना त्यांना ओळखता देखील येत नाही. राम और शाम... सीता और गीता... जुडवा... यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये जुळ्यांची किमया आपण पडद्यावर पाहिली.

पण अशीच जुळी भावंडं एका संमेलनाच्या निमित्तानं चिपळूणला एकत्र जमली होती. एकमेकांसारख्या जुळ्या भावंडांबाबत नेहमीच कुतूहल, आकर्षण असतं. एकानं मस्ती करायची आणि दुस-यानं मार खायचा. एक जण उपाशी तर दुस-याला दोन दोनदा खायची सक्ती. असं जुळ्यांच्या बाबतीत अनेकदा घडतं आणि त्यातूनच अनेक गंमतीजंमती जन्माला येतात.

जुळ्या मुलांना वाढवणं हे पालकांसाठी देखील मोठं आव्हान असतं. त्यामुळं अशा पालकांचं सामूहिक कुटुंब तयार व्हावं, हा देखील या उपक्रमाचा उद्देश होता. या जुळ्यांना एकत्र आणण्याची कल्पना सुचली रोटरी क्लबला. त्यातून 'वुई द ट्विन्स' अर्थात जुळ्या भावंडांचं संमेलन चिपळूणमध्ये संपन्न झालं.

चिपळूणमधला अशाप्रकारचा हा पहिलाच मेळावा होता. यानिमित्तानं जुळ्यांचं भावविश्व अनुभवण्याची संधी इतरांना मिळाली.