Ratnagiri Thiba Palace : रत्नागिरीटं नाव घेतलं की डोळ्यासमोर सुंदर निसर्ग चित्र उभं राहत. रत्नागिरी हा कोकणातील सर्वात सुंदर जिल्हा आहे. अथांग समुद्र किनारा, प्राचीन मंदिरे, आड वळणाच्या वाटा, आंब्याच्या बागा आणि शांत, निवांत परिसर. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या याच रत्नागिरी जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे. रत्नागिरी हि लोकमान्य टिळकांची जन्मभूमी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी आहे. याच रत्नागिरी जिह्यात असा एक राजवाडा आहे जो ब्रिटीशांनी एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधला होता. हा राजवाडा म्हणजेच ब्रिटिशांच्या क्रूरपणाचा पुरावाच म्हणावा लागेल. अनेक पर्यटक या राजवाड्याला आवर्जून भेट देतात.
ब्रिटीशांनी बांधलेल्या या राजवाड्याचे नाव आहे थिबा पॅलेस. हा राजवाडा रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ आहे. थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशच्या(आत्ताचं म्यानमार) थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला होता. थिबा राज्याच्या नावावरुनच या राजवाड्याला थिबा पॅलेस असे नाव देण्यात आले आहे. 1910 मध्ये हा राजवाडा बांधम्यात आला होता. 1916 पर्यंत या राजवाड्यात म्यानमारचा राजा आणि राणी वास्तव्यास होते. आता या राजवाडयात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले आहे. या राजवाड्यात थिबा राजाने वापरलेल्या अनेक गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत.
हा राजवाडा तीन मजली आहे. राजवाड्याचे बांधकाम अतिशय सुंदर आहे. कौलारु छत असलेला हा भव्य दिव्य राजवाडा पाहून पर्यटक थक्क होतात. राजवाड्यातील सुंदर कोरीव काम असलेल्या अर्ध-परिमिती लाकडी खिडक्या या संरचनेचे मुख्य आकर्षण आहेत. पहिल्या मजल्यावर संगमरवरी मजल्यासह एक नृत्य कक्ष आहे. राजवाड्याच्या मागच्या बाजूला एक बुद्ध मूर्ती स्थापित केली आहे. ही मूर्ती राजा थिबा यांनी भारतात आणली होती. या राजवाड्यातून सोमेश्वर नदी खाडी, भाट्ये समुद्र किनारा यांचे अतिशय मनमोहक दृष्य दिसते. याला थिबा पाईंट असेही म्हणतात. थिबा पाईंट सूर्यास्तासाठी देखील प्रसिद्ध आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत थिबा पॅलेसला भेट देऊ शकता.
रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरुन थेट रिक्षा करुन तुम्ही थिबा पॅलेसला पोहचू शकता. साधारण 25 ते 30 मिनिटांचा हा प्रवास आहे. बस ने प्रवास करत असल्यास रत्नागिरी बस स्थानकात उतरुन तिथून रिक्षाने अवघ्या 10 ते 15 मिनीटांत येथे पोहचता येईल. थिबा पॅलेसला भेट दिल्यानंतर जवळ असणारा भाटे समुद्र किनारा, मत्सालय, पांढरा समुद्र तसेच मांडवी बीच तसेच रत्नदुर्ग या जवळच्या ठिकाणांना देखील भेट देऊ शकता.